डेक्कन ओडिसीची झाली मद्यासाठी तपासणी

By Admin | Updated: May 13, 2016 00:59 IST2016-05-13T00:59:16+5:302016-05-13T00:59:16+5:30

विदेशी पर्यटकांना पर्यटनासाठी जिल्ह्यात घेऊन आलेल्या डेक्कन ओडिसी या पंचतारांकित रेल्वेत मद्य असल्याच्या तक्रारीनंतर रात्री उशिरा तपासणी झाली.

Deccan Odyssey checks for liquor | डेक्कन ओडिसीची झाली मद्यासाठी तपासणी

डेक्कन ओडिसीची झाली मद्यासाठी तपासणी

मद्य आढळलेच नाही : मात्र पर्यटकांना मनस्ताप
चंद्रपूर : विदेशी पर्यटकांना पर्यटनासाठी जिल्ह्यात घेऊन आलेल्या डेक्कन ओडिसी या पंचतारांकित रेल्वेत मद्य असल्याच्या तक्रारीनंतर रात्री उशिरा तपासणी झाली. मात्र मद्य तर आढळलेच नाही, उलट भ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचा खेदजनक प्रकार बुधवारी चंद्रपुरात घडला. या रेल्वेमध्ये मद्य आणले असून त्याचा वापर पर्यटकांकडून होत असल्याच्या तक्रारीवरून राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि रेल्वे पोलिसांनी ही तपासणी केली होती, हे विशेष !
बुधवारी पहाटे साडेतीन वाजता ही डेक्कन ओडीसी पंचतारांकित रेल्वे चंद्रपूरच्या रेल्वे फलाटावर लागली. त्यानंतर सकाळी पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वनभ्रमंतीसाठी निघून गेले. दरम्यान, ही पंचतारांकित रेल्वे चंद्रपुरात पोहचल्याची बातमी कर्णोपकर्णी झाली. या रेल्वेमध्ये मद्य आणि बिअर बार असून त्याचा वापर होत असल्याच्या बातम्याही शहरात पसरल्या. दरम्यान, शहरातील दारूबंदी विरोधकांच्या पुढाऱ्यांनी काही समर्थकांसह रेल्वे स्टेशनवर येवून माध्यमांच्या प्रतिनिधींजवळ प्रतिक्रिया देणे सुरू केले. सोशल मिडीयावरूनही ही माहिती फिरल्याने यावर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया येत राहील्या. दरम्यानच्या काळात या पंचतारांकित रेल्वेतून मद्य चंद्रपुरात आल्याने दारूबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीही पोलिसात केल्या. त्यामुळे दिवसभर बराच गोंधळ उडाला होता. तक्रारकर्त्यांच्या वाढत्या आग्रह लक्षात घेता पोलिसात झालेली तक्रार रेल्वे पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली. अखेर धावपळ करीत राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांची चमू रेल्व स्थानकावर पोहचली. त्यांनी रेकॉर्डची तपासणी केली. रेल्वे पोलिसांनीही या रेल्वेची आणि रेकॉर्डची पाहणी केली. मात्र या तपासणीमध्ये मद्य अथवा आक्षेपार्ह असे काहीच आढळले नाही. या तपासणीनंतर ही रेल्वे पुढच्या प्रवासाठी रवाना झाली.
या प्रकारामुळे पर्यटकांना मनस्ताप मात्र सहन करावा लागला. काय सुरु आहे, हे कळल्यावर पर्यटकांनी या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, पर्यटकांपैकी एकाने पर्यटन विकास महामंडळाच्या मुंबई आयुक्त कार्यालयात भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आयुक्तांशी राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची चर्चा करवून दिली. एकीकडे पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सरकारकडून होत असताना दारूबंदी उल्लंघनाच्या नावाखाली देशीविदेशी पर्यटकांना झालेला मनस्ताप आणि दारूबंदी विरोधकांचा तसेच माध्यमांचा उथळपणा चर्चेचा ठरला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Deccan Odyssey checks for liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.