चंद्रपूर : खरीप हंगामात विविध बँकांतून एक लाख ४ हजार १६४ शेतकऱ्यांना ७५५.६४ कोटींचे खरीप पीक कर्ज वाटप झाले. गरीब व गरजू नागरिकांसाठी २२ शिवभोजन केंद्रातून सुमारे सहा लाख शिवभोजन थाळी केवळ पाच रुपये दरात उपलबध करून दिली. धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा अतिरिक्त ७०० रुपये बोनस देणारे महाराष्ट्राचे महाविकास आघाडी शासन हे देशातील एकमेव सरकार आहे. याचा थेट फायदा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे व सर्व विभागप्रमुख, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, ज्येष्ठ नागरिक, कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोरोनावर प्रभावी नियंत्रण ठेवले. पूरग्रस्त भागासाठी शासनातर्फे ४२ कोटीची मदत मंजूर करून त्यातील ३६ कोटी मदत वाटप केले. ५९ केंद्रांवरून आतापर्यंत चार लाख ३७ हजार क्विंटल धान खरेदी झाली. गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. प्रकल्पाकरिता एक हजार कोटीव्यतिरिक्त अधिकचे ५०० कोटी म्हणजे दरवर्षी दीड कोटी रुपये देण्यास मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शविल्याची माहितीही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली. सुरुवातीला संविधानामधील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. पालकमंत्र्यांच्या हस्ते कोविड योद्धा तसेच पोलीस दलातील एएसआय लिलेश्वर वऱ्हाडमारे व विजय बोरीकर यांना गुणवत्ता सेवा पदक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सत्कार केला. संचालन मोंटू सिंग व मंगला घागी यांनी केले.
बचत गटांना कर्ज वाटपात राज्यात अग्रेसर
बचत गटांना कर्ज वाटप करण्यात जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. पोषण अभियानामध्ये उत्तम काम करीत पाच हजार परसबागांची निर्मिती केली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात देशी विदेशी पर्यटक भेटीवर येतात. येथे पर्यटनाला चालना देण्यासाठी ताज ग्रुपबरोबर करार करून पंचतारांकित हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. महेन्द्रा क्लब, लि-मेरीडीअन, रेडीसन ब्ल्यू यांसारखी पंचतारांकीत हॉटेल्स या भागात येऊ पाहत आहेत. यातून महसूल व रोजगाराच्या संधी वाढतील, असेही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.