सोसायट्यांची कर्जवसुली यंदा ४५ टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:13+5:302021-04-23T04:30:13+5:30
नागभीड : यावर्षी सोसायट्यांची कर्जवसुली ४५ टक्क्यांच्या आत झाली आहे. विक्री केलेल्या धानाची देयके वेळेवर न मिळाल्याचा हा परिणाम ...

सोसायट्यांची कर्जवसुली यंदा ४५ टक्केच
नागभीड : यावर्षी सोसायट्यांची कर्जवसुली ४५ टक्क्यांच्या आत झाली आहे. विक्री केलेल्या धानाची देयके वेळेवर न मिळाल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
माहितीनुसार यावर्षी मार्चअखेर ३,९८५ सभासदांची १५ कोटी ५२ लाख २६ हजार रुपयांची वसुली प्राप्त झाली आहे.
मागील काही वर्षांपासून शासनाकडून शेतकऱ्यांना बिनव्याजी पतपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेती करण्यासाठी पतपुरवठा घेतल्यानंतर हा पतपुरवठा मार्च महिन्यात परत केला, तर या पतपुरवठ्यावर व्याज आकारण्यात येत नाही, अशी माहिती आहे. या योजनेचा या तालुक्यातील शेकडो शेतकरी लाभ घेत आहेत.
डिसेंबर महिन्यात धानाची फसल हाती आली की, जानेवारी ते मार्च या महिन्यांत शेतकरी खासगी व्यापारी व कृ.उ.बा.स.मध्ये धानाची विक्री करायचे व आलेल्या देयकातून घेतलेल्या पतपुरवठ्याची परतफेड करायचे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून नागभीड तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाने धान खरेदी सुरू केली आहे. या दोन्ही प्रतिष्ठानांवर मोठ्या प्रमाणावर धान खरेदी होत आहे. यावर्षीही या दोन्ही प्रतिष्ठानांनी विक्रमी धान खरेदी केली. मात्र, या प्रतिष्ठानांना फेब्रुवारीच्या शेवटी व मार्च महिन्यांत खरेदी केलेल्या धानाची देयके शासनाकडून प्राप्त झाली नाहीत. परिणामी, ही प्रतिष्ठाने शेतकऱ्यांची देयके अदा करू शकली नाहीत, अशी माहिती आहे. आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघाकडून शेतकऱ्यांना विकलेल्या धानाचे चुकारे न मिळाल्याने शेतकरी मागील वर्षी घेतलेला पतपुरवठा अदा करू शकले नाहीत. परिणामी सोसायट्या व बँकांची कर्जवसुली झाली नाही.
बॉक्स
१५ कोटी ५२ लाखांचीच वसुली
एकूण ३ हजार ९८५ सभासदांकडून १५ कोटी ५२ लाख २६ हजार रुपयांचीच वसुली प्राप्त झाली असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.
विक्री केलेल्या धानाचे चुकारे वेळेवर न मिळणे हे कर्जवसुलीत अडचणीचे ठरले असले तरी यामागे दुसरेही एक कारण आहे. जेव्हा- जेव्हा शासनाकडून कर्जमाफी केली जाते, तेव्हा- तेव्हा कर्जमाफीचा लाभ हा ‘थकीत’ शेतकऱ्यांनाच होत आला आहे. नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना आजवर या कर्जमाफीचा लाभ झाला नाही. नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह रक्कम देण्यात येईल, अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली होती; पण ही घोषणा अद्यापही हवेतच आहे. याचा राग म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी घेतलेले कर्ज भरले नाही, अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे.