वैद्यकीय महाविद्यालयावरून पुन्हा वाद
By Admin | Updated: January 28, 2015 23:12 IST2015-01-28T23:12:21+5:302015-01-28T23:12:21+5:30
वैद्यकीय महाविद्यालयासाठी म्हाडा परिसरातील जागा योग्य असतानाही वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नागरिकांचे हित न बघता केवळ आपल्या कुटुंबीयातील सदस्यांच्या

वैद्यकीय महाविद्यालयावरून पुन्हा वाद
चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालयासाठी म्हाडा परिसरातील जागा योग्य असतानाही वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नागरिकांचे हित न बघता केवळ आपल्या कुटुंबीयातील सदस्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भविष्यात सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागणार असल्याचा आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत केला. येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
म्हाडामध्ये शासकीय कार्यालयासाठी ७५ एकर जागा आरक्षित आहे. मात्र येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांना ही जागा पसंत येत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुनगंटीवार आपला हट्टा पूर्ण करण्यासाठी जागा बदलवित आहे. यासंदर्भात आपण अधिक चौकशी केली असता म्हाडा येथील आरक्षित जमिनीमध्ये मुनगंटीवार यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावाने २० ते २५ एकर जमिन आहे. येथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास सरकार ही जागा शासकीय दराने घेईल. त्यामुळे त्यांचे नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठीच मुनगंटीवार वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलवित असल्याचे आरोप त्यांनी केला आहे.
अनुभवी नेते आणि राज्यमंत्रीमंडळातील त्यांचे स्थान लक्षात घेता नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांनी म्हाडा परिसरात वैद्यकीय महाविद्यालयासाठी पुढाकार घ्यावा. म्हाडा परिसरात आपली ७ एकर जमीन आहे. मात्र वैद्यकीय महाविद्यालय या परिसरात आणल्यास आपल्याला कोणताही नफा-तोटा होणार नसल्याचेही ते म्हणाले. बारामतीच्या धर्तीवर वित्तमंत्री तथा पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी शंभर कोटी रुपये देवून विकास साधावा असेही ते म्हणाले.
यासंदर्भात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाही. (नगर प्रतिनिधी)