जिवती तालुक्यातील मृत्यू तीनवर
By Admin | Updated: August 13, 2016 00:26 IST2016-08-13T00:26:52+5:302016-08-13T00:26:52+5:30
जिवती तालुक्यात तापाच्या साथीमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये दोघांची भर पडली असून एकूण तीन मृत्यू झाले आहेत.

जिवती तालुक्यातील मृत्यू तीनवर
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक पल्लेझरीत : चारपैकी तीन बोअरवेलचे पाणी पिण्यास अयोग्य
पाटण : जिवती तालुक्यात तापाच्या साथीमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये दोघांची भर पडली असून एकूण तीन मृत्यू झाले आहेत. आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्यानंतर पल्लेझरीमध्ये पाहणी करण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी दाखल झाले. पथकाने पल्लेझरीमधील रूग्णांची तपासणी केली.
जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथे डायरिया व मलेरिया या रोगांनी थैमान घातले आहे. मोंगाराम मेश्राम (४०) यांचा मृत्यू मलेरियाने झाला आहे. दिनेश मोरताटे (१३) याचाही मृत्यू मलेरियाने झाला. त्यानंतर बाली केशव चव्हाण (१) या बालिकेचाही मृत्यू डायरियाने झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पल्लेझरी गावाची लोकसंख्या एक हजार असून चार बोअरवेल व एका विहिरीवरून पिण्यासाठी पाणी उपयोगात आणले जाते. त्यापैकी तीन बोअरवेल व विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य आहेत. परंतु गावकऱ्यांना दुसरा पर्याय नसल्यामुळे त्याच पाण्याचा वापर करते. परिणामी अर्धे गाव आजारी पडले आहे. पाटण येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य पथकाने पल्लेझरी गावाचा दौरा केला. गावामध्ये जाऊन पथकाने रूग्णांची तपासणी केली. त्यांच्यावर औषधोपचार केला. पाण्याचे नमुने घेण्याबाबत ग्रामसेवकाला सुचना करण्यात आल्या. डायरिया व मलेरियामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)
दिनेश मोरताटे (१३) याचा मृत्यू झाला असून तो मलेरिया पॉझिटिव्ह होता. त्याला रूग्णालयात दाखल करण्याची सुचना पालकांना केली होती. मात्र पालकांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही.
- डॉ. कविता शर्मा,
वैद्यकिय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण.