उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू
By Admin | Updated: May 15, 2014 23:24 IST2014-05-15T23:24:23+5:302014-05-15T23:24:23+5:30
येथील वाल्मिक नगरमधील नऊ महिन्याच्या मुलीला डायरियाची लागण झाल्याने उपचारार्थ पालकांनी शिवाजी चौकातील डॉ. खंडाळे यांच्या रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू
ब्रह्मपुरी : येथील वाल्मिक नगरमधील नऊ महिन्याच्या मुलीला डायरियाची लागण झाल्याने उपचारार्थ पालकांनी शिवाजी चौकातील डॉ. खंडाळे यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान बालिकेचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर बालिकेच्या पालकांनी मृत्यूच्या चौकशीसाठी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान मुलीच्या पालकांनी शिविगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार रुग्णालयातील एका वॉर्डबॉयने पोलिसांकडे केल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. वाल्मिकनगर येथील रहिवासी सत्यवान मारोती शेंडे यांची नऊ महिन्याची मुलगी रक्षा हिला बुधवारी रात्री अचानक हगवन व उलटीचा त्रास सुरू झाला. या आधीचा रक्षाचा नियमित उपचार डॉ. खोब्रागडे यांच्याकडे सुरू होता. घटनेच्या दिवशी डॉ. खोब्रागडे रुग्णालयात हजर नसल्यामुळे वडिलांनी जवळच असलेल्या डॉ. खंडाळे यांच्या रुग्णालयात तिला उपचारार्थ दाखल केले. डॉ. खंडाळे यांनी तिची तपासणी करून डायरियाची लागण झाल्यामुळे शरिरातील पाणी कमी झाल्याचे सांगितले. सलाईन लावल्यानंतर रात्री ८ वाजताच्या दरम्यान एक इंजेक्शन दिले. त्यानंतर उपस्थित नर्सला उपचारासंदर्भात पुढील निर्देश देत डॉ.खंडाळे काही कामानिमित्त बाहेर निघून गेले. जाताना मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र डॉक्टर निघून गेल्यानंतर काही वेळातच मुलीचा अचानकपणे मृत्यू झाला. सदर घटनेनंतर मुलीच्या पालकांनी मुलीच्या मृत्युच्या चौकशीकरिता ब्रह्मपुरी पोलिसांकडे तक्रार केली. या घटनेनंतर मृत मुलीच्या पालकांची भेट घेतली असता, डॉक्टर निघून गेल्यानंतर उपस्थित नर्सने पुढील उपचार म्हणून मुलीला एकाचवेळी दोन-तीन इंजेक्शन दिल्याचे सांगितले. काही वेळात मुलीच्या शरीराची हालचाल बंद झाली. याबाबत विचारणा केली असता, मुलीला दुसर्या दवाखान्यात घेऊन जा, असा सल्ला उपस्थित कर्मचार्यांनी दिला. लगेच रात्री १२ वाजता डॉ. खोब्रागडे यांच्याकडे नेले असता, मुलीचा एक तासाआधीच मृत्यू झाल्याचे खोब्रागडे यांनी सांगितले. डॉ. खंडाळे स्वत: ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे शवविच्छेदन अहवालावर कोणताही आक्षेप राहू नये मृत बालिकेला शवविच्छेदनासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निखाडे यांनी सांगितले. मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. वॉर्डबॉयच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)