चार कामगारांच्या मृत्यूने वेकोली कामगार धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:20+5:302021-04-19T04:25:20+5:30
: उपाययोजनेसाठी कामगारांचे काम बंद आंदोलन सास्ती : राजुरा तालुक्यात वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध कोळसा खाणींत कोरानाचा शिरकाव ...

चार कामगारांच्या मृत्यूने वेकोली कामगार धास्तावले
: उपाययोजनेसाठी कामगारांचे काम बंद आंदोलन
सास्ती : राजुरा तालुक्यात वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विविध कोळसा खाणींत कोरानाचा शिरकाव झाला आहे. चार कामगारांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच कामगारांनी कोळसा खाणीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी करीत शनिवारी सास्ती खुल्या कोळसा खाणीत नारेबाजी करून काम बंद पाडले होते.
राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यात तालुक्यात असलेल्या वेकोलीच्या विविध कोळसा खाणींतही कोरोनाचा शिरकाव होत असून सास्ती कोळसा खाणीतील चार कामगारांचा मृत्यू कोरोनाने झाल्यामुळे वेकोली कामगारांमध्ये भीती पसरली आहे. राज्यात कोराेनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी विविध उपाययोजना केल्या जात आहे. संचारबंदी, जमावबंदी, लॉकडाऊन किंवा कोरोनाबाधित प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र वेकोलीच्या कोळसा खाणीत असा कुठलाही प्रकार दिसून येत नसून, या सर्व नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोराेनाचा प्रादुर्भाव जाणवतो. रामपूर, साखरी, सास्ती, धोपटाळा परिसरांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले असून, एकट्या गोवरी गावात एकाच दिवशी २१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे लागलीच गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. वेकोलीमध्ये विविध परिसरांतून कामगार कामावर येतात, कोळसा वाहतुकीसाठी विविध राज्यातूनही ट्रक आणि ट्रक चालक येतात, कामगार एकत्रित काम करतात, कामगारांचे घोळकेच्या घोळके एकत्रित येत गप्पा मारल्या जातात, प्रशासनाच्या वतीने कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे कामगारांनी सास्ती खुल्या कोळसा खाणीत काम बंद करीत नारेबाजी केली. याप्रसंगी कामगार नेते आर. आर. यादव, विजय कानकाटे, दिनेश जावरे, दिलीप कनकुलवार, गणेश नाथे, अशोक चिवंडे उपस्थित होते.