जिवंत महिलेस मृत दाखवून लाटला ‘डेथक्लेम’

By Admin | Updated: September 29, 2016 00:57 IST2016-09-29T00:57:31+5:302016-09-29T00:57:31+5:30

आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अनेक जण आपला विमा काढतात. मात्र काही अभिकर्त्याद्वारे ग्राहकाची लूट केली जात आहे.

Dead girl burnt alive woman dead | जिवंत महिलेस मृत दाखवून लाटला ‘डेथक्लेम’

जिवंत महिलेस मृत दाखवून लाटला ‘डेथक्लेम’

पोलिसात तक्रार : विमा अभिकर्त्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ
गोंडपिपरी : आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अनेक जण आपला विमा काढतात. मात्र काही अभिकर्त्याद्वारे ग्राहकाची लूट केली जात आहे. गडचिरोलीच्या एलआयसी शाखेतील एका विमा अभिकर्त्याने तालुक्यातील राळापेठ येथील जीवंत महिलेला मृत दाखवून विमा राशी लाटण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याला महिनाभराचा कालावधी लोटूनही संबंधित विमा अभिकर्त्यावर कारवाई करण्यास एलआयसीच्या वरिष्ठांकडून टाळाटाळ केली जात असल्याने पॉलिसीधारकाकडून संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील राळापेठ येथील साधना किसन पिंपळशेंडे यांनी वर्ष २००९ मध्ये एलआयसी गडचिरोली शाखेच्या विमा अभिकर्त्याकडून विमा पॉलिसी काढली. मुदतीपूर्व ती पॉलिसी काढण्याकरिता शाखेत गेल्या असता तेथील प्रकार पाहून त्या दंग झाल्या. त्यांनी आपल्या पॉलिसीबाबत विचारले असता त्यांच्या समक्ष त्यांना मृत असे संबोधून तुमची मृत्युपश्चात विमा राशी तुमच्या वारसांच्या नावे जमा करण्यात आल्याचे उत्तर मिळाले. हे ऐकताच त्यांनी तेथील शाखा व्यवस्थापक यांना भेटून याबाबतची तक्रारही केली. यावेळी शाखा व्यवस्थापकांनीदेखील पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यामुळे त्यांनी संबंधित विमा अभिकर्ता कृष्णा मंडल व त्यांचे पती कवीत मंडल यांची भेट घेऊन त्यांना याबाबत जाब विचारला व पुन्हा गडचिरोेली शाखा गाठून तेथील व्यवस्थापकांना आपण जिवंत असल्याची माहिती पुरविली. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर विमा अभिकर्त्यानेच रक्कम लाटल्याची माहिती पुढे आली. यावर संबंधित विमा अभिकर्ता व शाखा व्यवस्थापक यांनी साधना पिंपळशेंडे यांची समजूत घालण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला. मात्र साधना पिंपळशेंडे यांचा मुलगा अक्षय याने या संबंधीची तक्रार पोलिसात देण्याचे ठरविले. त्याने गावी येवून गोंडपिपरी ठाणे गाठून जिवंत व्यक्तीला मृत दाखवृन तीन लाख ३२ हजारांचा डेथक्लेम लाटणाऱ्याविरुद्ध पोलीसात तक्रार दिली. मात्र प्रकरण गडचिरोली जिल्ह्यातील असल्याने गोंडपिपरी पोलिसांनी सदर प्रकरण गडचिरोली पोलिसांना सुपूर्द केले. आज या प्रकरणाला महिनाभराहूनही अधिक दिवस लोटले असून कोट्यवधी ग्राहकांची विश्वसनीय असलेल्या एलआयसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून न्याय मिळाला नसल्याची खंत अक्षय पिंपळशेंडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. संबंधित विमा अभिकर्ता व गडचिरोली एलआयसी शाखेचे अधिकारी यांच्या संगणमताने हा सर्व प्रकार घडला असून या प्रकरणाचा कसून तपास केल्यास मोठे रॅकेट गळाला लागणार असल्याचेही अक्षय यांचे म्हणणे आहे. या गैरव्यवहाराला वरिष्ठांची मुक संमती आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dead girl burnt alive woman dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.