शिक्षकांची डीसीपीएस रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी

By Admin | Updated: May 18, 2015 01:20 IST2015-05-18T01:20:57+5:302015-05-18T01:20:57+5:30

डीसीपीएस योजनेतून वगळलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची रक्कम भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा होण्याबाबत..

The DCPS of teachers should be deposited in the provident fund account | शिक्षकांची डीसीपीएस रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी

शिक्षकांची डीसीपीएस रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावी

चंद्रपूर : डीसीपीएस योजनेतून वगळलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची रक्कम भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा होण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी रविकांत देशपांडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे गुरुवारी भेटून केली आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत डीसीपीएस योजनेतून वगळलेले व भविष्यनिर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त १०० पेक्षा अधिक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहेत. संबंधित सर्व शिक्षकांची डीसीपीएस योजनेत रक्कम जमा आहेत.
पाच वर्षांचा कालावधी होऊनसुद्धा डीसीपीएस योजनेतील जमा रक्कम संबंधित शिक्षकांच्या भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा न झाल्यामुळे भविष्यनिर्वाह निधी खात्यात शिल्लक रकमेत डीसीपीएस रक्कम नसल्यामुळे परतावा रक्कम काढण्यासंदर्भात प्राथमिक शिक्षकांना योग्य रक्कम मिळत नाही. संबंधित रकमेवरच्या व्याजापासून प्राथमिक शिक्षकांना सध्याच्या स्थितीत वंचित रहावे लागत आहे. एका शिक्षकाच्या खात्यात जवळपास ३० हजाराच्यावर रक्कम असून सर्व लाभार्थी प्राथमिक शिक्षक मिळून हा आकडा लाखो रुपयांपर्यंत जात आहे. संबंधित शिक्षकांच्या मासिक पगारातून कपात रक्कम डीसीपीएस खात्यात प्रशासनाने जमा केली. संबंधित शिक्षकांची डीसीपीएस योजना बंद झाल्यामुळे ती सर्व रक्कम प्रशासनाने भविष्यनिर्वाह निधी खाते क्रमांकात वळती करणे संबंधात कार्यवाही करणे आवश्यक होते. प्रशासनाने ही रक्कम वळती न केल्यामुळे या रक्कमेचा लाभ प्राथमिक शिक्षकांना घेता येत नसल्यामुळे त्यांच्यात प्रचंड असंतोष पसरला आहे. सध्या स्थितीत आर्थिक वर्ष संपल्यानंतर माहे जूननंतर भविष्यनिर्वाह निधीचा हिशोब न देणारा वित्त विभाग या शिक्षकांचा हिशोब कधी देणार? असा प्रश्न अन्यायग्रस्त शिक्षकांकडून विचारला जात आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेच्यावतीने वरिष्ठ लेखाअधिकारी रवींद्र येवले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर व वित्त विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी समन्वय साधून अन्यायग्रस्त प्राथमिक शिक्षकासंबंधीची बाब गांभीर्याने घेऊन डीसीपीएस योजनेतून वगळलेली प्राथमिक शिक्षकांची रक्कम भविष्यनिर्वाह निधी खात्यात वळती होण्यासंबंधीची कार्यवाही करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान संबंधीत प्रकरणाकडे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने परिषदेने राज्य शासनाकडेसुद्धा निवेदन पाठविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The DCPS of teachers should be deposited in the provident fund account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.