ज्या दिवशी अर्ज, त्याच दिवशी मिळाले वीजमिटर
By Admin | Updated: August 4, 2016 00:48 IST2016-08-04T00:48:03+5:302016-08-04T00:48:03+5:30
स्मार्ट फोनच्या आजच्या युगात महावितरणही स्मार्ट झाले आहे.

ज्या दिवशी अर्ज, त्याच दिवशी मिळाले वीजमिटर
ग्राहकाला दिलासा : वरोरा उपविभागाची कार्यवाही
वरोरा : स्मार्ट फोनच्या आजच्या युगात महावितरणही स्मार्ट झाले आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून महावितरण कंपनीने ग्राहकांना सेवा पुरविणे सुरू केले आहे. वरोरा उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या खांबाडा येथील तलाठी कार्यालयाने विद्युत मिटरकरिता अर्ज केला, त्याच दिवशी सर्व सोपस्कार पूर्ण करीत तत्काळ विद्युत मिटर लावून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. ज्या दिवशी अर्ज, त्याच दिवशी विद्युत मिटर देवून वीज पुरवठा सुरू करणारे वरोरा पहिलेच उपविभाग ठरल्याचे मानले जात आहे.
महावितरण कंपनीकडे विद्युत मिटर घेण्याकरिता सर्व कागदपत्रासह अर्ज करावा लागतो. त्यानंतर वीज कर्मचारी मोजमाप व शहानिशा करण्याकरिता नविन वीज घेणाऱ्या ग्राहकाकडे जातात. त्यानंतर अर्ज कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्याची आॅनलाईन नोंदणी करून डिमांड ग्राहकाला दिले जाते. डिमांड ग्राहकाने अदा केल्यानंतर काही दिवसांनी विद्युत मिटर दिले जाते. यामध्ये ग्राहकांना वेळोवेळी वीज वितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागते. याकरिता महावितरण कंपनीने नुकतेच ग्राहकांना कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता मोबाईल अॅप्स विकसीत करून कार्यान्वित केले आहे.
याच माध्यमातून वरोरा तालुक्यातील खांबाडा येथील तलाठी कार्यालयात विद्युत पुरवठा व नवीन विद्युत मिटर लावण्याकरिता खांबाडा वीज वितरण केंद्रातून वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयाला अर्ज प्राप्त झाला. मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर यांनी अर्ज प्राप्त झाल्याच्या अवघ्या काही तासातच अर्जाचे पूर्ण सोपस्कार पूर्ण करीत खांबाडा येथील तलाठी कार्यालयात विद्युत मिटर लावून, त्याच दिवशी विद्युत पुरवठा सुरू केला. यावेळी वरोरा महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डब्ल्यू. जी. नगराळे, उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर, खांबाडा येथील अभियंता रावत, खांबाडा मंडळ अधिकारी ठवरे, तलाठी कोंटागले व वीज कर्मचारी उपस्थित होते. महावितरणने राज्यात मोबाईल अॅप विकसीत केल्यानंतर ज्या दिवशी अर्ज, त्याच दिवशी वीज पुरवठा करणारे वरोरा उपविभाग पहिले ठरले आहे. (तालुका प्रतिनिधी)