कृषी सहायकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 00:32 IST2017-06-20T00:32:03+5:302017-06-20T00:32:03+5:30
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका शाखेच्या वतीने कृषी विभागात सुधारीत आकृती बंध तयार करण्यात यावा ...

कृषी सहायकांचे धरणे आंदोलन
कृषी आकृतीबंधाची मागणी : बेमुदत आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका शाखेच्या वतीने कृषी विभागात सुधारीत आकृती बंध तयार करण्यात यावा व कृती सहाय्यकांमधून पर्यवेक्षकाची पदे भरण्यात यावी, या मागणीसाठी कृषी सहायकांनी धरणे आंदोलन करुन लेखणीबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.
कृषी सहायकांनी ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आंदोलन सुरू केल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. न्याय मागण्या मान्य न झाल्यास येत्या १० जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे कृषी विभागाची कामे प्रभावित होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने मृत व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. याच अनुषंगाने मे महिन्यात शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. यासाठी कृषी विभागातील कर्मचारी मृद व जलसंधारण विभागात वर्ग करण्याचे ठरविण्यात आले. यामुळे कृषी सहाय्यक पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. कृषी विभागातील भवितव्यावरुन चिंता सतावत आहे. यावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ जूनपासून टप्प्यानुसार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामुळे खरीपाच्या पेरणी दरम्यान शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने कृषी सहाय्यकांच्या मागण्या मान्य करुन तोडगा काढण्याची गरज आहे.
पुढील टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर धरणे, १ जुलैला कृषी आयुक्त पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचे ठरविण्यात आले असून ३० जुलैपासून बेमुदत आंदोलन करण्याची तयारी संटघनेच्या पदाधिकाऱ्यांनी चालविली असून कामे प्रभावित होणार आहेत.