रानडुकराच्या धुमाकुळाने धानाचे नुकसान
By Admin | Updated: November 7, 2015 00:45 IST2015-11-07T00:45:21+5:302015-11-07T00:45:21+5:30
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपिक हाती येण्याच्या तयारीत असताना रानडुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून धानपिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत.

रानडुकराच्या धुमाकुळाने धानाचे नुकसान
शेतकरी त्रस्त : वन्यप्राण्यांचा उभ्या पिकावर हल्ला
पोंभुर्णा : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपिक हाती येण्याच्या तयारीत असताना रानडुकरे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून धानपिकांचे प्रचंड नुकसान करीत आहेत. त्यामुळे हाती आलेल्या धान पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांना अख्खी रात्र जागून काढावी लागत आहे.
प्राण्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करुन संबंधीत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. तालुक्यातील देवाडा खुर्द, डोंगरहळदी, उमरी पोतदार, रामपूर दीक्षित, जामखुर्द, जामतुकूम, घनोटी, विहीरगाव, आंबेधानोरा, चेकहत्तीबोडी, कोसंबी रिठ, थेरगाव आदी गावासह अनेक गावात शेतकऱ्यांच्या शेतात रानटी डुकर व इतर जनावरे शिरुन धान पिकांच्या लोंब्याची नासाडी करीत आहेत. त्यामुळे स्थानिक परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. सदर परिसरातमध्ये केवळ धानपिकांवर कुटुंबाची उपजिविका होत असल्याने उत्पादन झाले नाही तर जगायचे कसे या भितीने शेतकरी जिवाची पर्वा न करता जंगली प्राण्यांच्या दहशतीमध्ये सुद्धा पिकाच्या रक्षणासाठी रात्रभर मारोशीवर जागून पिकाचे रक्षण करीत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून या परिसरामध्ये पाहिजे त्या प्रमाणात सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने केवळ निसर्गावर अवलंबून शेतीचे उत्पादन घ्यावेलागते. पाण्याअभावी परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे धानपिक करपायला लागले आहेत. दुसरीकडे काही प्रमाणात धानपिक तग धरुन असताना रानटी डुकरांच्या धुमाकुळाने नष्ट होणार की काय, या भितीने परिसरातील शेतकरी धस्तावला आहे. त्यामुळे खरीप हंगामात घेतलेले कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)