गुप्ता एनर्जी प्लान्टच्या व्यवस्थापकाची दबंगगिरी
By Admin | Updated: September 12, 2016 00:46 IST2016-09-12T00:46:50+5:302016-09-12T00:46:50+5:30
नजीकच्या उसगाव रस्त्यावरील गुप्ता एनर्जी कारखान्याचे व्यवस्थापक व त्यांच्या मुलाकडून कामगाराला सुरक्षा साधनाची सोय उपलब्ध करून न देता काम करण्यास बाध्य करीत आहेत.

गुप्ता एनर्जी प्लान्टच्या व्यवस्थापकाची दबंगगिरी
कामगारांत रोष : व्यवस्थापकाच्या मुलाचाही दबाव
घुग्घुस : नजीकच्या उसगाव रस्त्यावरील गुप्ता एनर्जी कारखान्याचे व्यवस्थापक व त्यांच्या मुलाकडून कामगाराला सुरक्षा साधनाची सोय उपलब्ध करून न देता काम करण्यास बाध्य करीत आहेत. मराठी भाषिक कामगारांवर दबंगशाही करून अपशब्दाचा वापर केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी असाच वाद झाल्याने कामगार पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. ठाणेदाराने दोन्ही उभय पक्षात समेट घडवून आणल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.
घुग्घुस-चंद्रपूर-ऊसगाव रस्त्यावर गुप्ता एनर्जीचा वीज प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाकरिता उसगाव, पांढरकवडा, शेणगाव, घुग्घुस परिसरातील उपजाऊ शेतजमिनी घेण्यात आल्या. प्रकल्पग्रस्तांना उशीरा का होईना नोकऱ्या दिल्या. मात्र अल्पावधीत कारखान्याचे उत्पादन बंद पडले. या कारखान्यातील ठेकेदारी कामगार बेरोजगार झाले. सुमारे शंभर प्रकल्पग्रस्त कामगारांना महिन्यातून १५-२० दिवस काम देण्यात येत असले तरी त्यांना तीन-तीन महिन्यानंतर वेतन देण्यात येते. प्रकल्पग्रस्तांची स्थिती शेती आणि रोजगारही गेल्यासारखी झाली आहे. या कारखान्यात कामगारांना सुरक्षा साधनाची सोय पुरेशी उपलब्ध होत नसल्याने जीव मुठीत घेवून काम करावे लागत आहे.
दोन दिवसांपूर्वी गवत कापण्याच्या कामावर कामगारांनी गमबूटची मागणी केली आणि वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेला. कामगार पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र ठाणेदारांनी दोन्ही उभय पक्षात समेट घडवून आणल्याने पुढील प्रकार टळला. असे असले तरी बापलेकाच्या दबंगगिरीवर कामगारांत रोष पसरला आहे. (वार्ताहर)
नेहमी अपशब्दाचा वापर
महाव्यवस्थापक शिवप्रसाद व त्याचा मुलगा डेक्स आॅपरेटर म्हणून काम करीत आहे. या बापलेकाकडून कारखान्यात काम करणाऱ्या मराठी भाषिक कामगारांचे शोषण सुरू आहे. महाराष्ट्रीयन या शब्दाचा वारंवार उपयोग करून अपमानित केले जात असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.