चिंतलधाबा येथे सिलिंडर गॅस वाटपात सावळागोंधळ
By Admin | Updated: May 13, 2015 00:06 IST2015-05-13T00:06:54+5:302015-05-13T00:06:54+5:30
वनव्यवस्थापन समिती व वनविभागाकडून गेल्या दोन वर्षापासून गॅस कनेक्शनचे पैसे भरुन सुद्धा गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात आले नसल्याने ....

चिंतलधाबा येथे सिलिंडर गॅस वाटपात सावळागोंधळ
पोंभुर्णा: वनव्यवस्थापन समिती व वनविभागाकडून गेल्या दोन वर्षापासून गॅस कनेक्शनचे पैसे भरुन सुद्धा गॅस कनेक्शनचा पुरवठा करण्यात आले नसल्याने स्थानिक लाभार्थ्यांवर अन्याय झाला आहे. यामुळे सरपनाचे मोठे संकट उभे ठाकले असून जाळण्यासाठी लाकडे कुठून आणावीत, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा व खरमत या गावातील लाभार्थ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून चिंतलधाबा येथील वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराव संभाजी कळते, खरमत येथील अध्यक्ष अनिल दादाजी शेडमाके व वनसंरक्षक पालीकोंडावार यांचेकडे स्थानिक लाभार्थ्यांनी दोन हजार २५२ रुपये तर काही लाभार्थ्यांनी एक हजार ५०० रुपये याप्रमाणे रक्कम जमा केली. त्यातील काही लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटपसुद्धा करण्यात आले. परंतु यातील बहुतांश लाभार्थ्यांना दोन वर्षांचा कालावधी लोटूनसुद्धा गॅस देण्यात आले नाही. त्यामुळे या योजनेत सावळा गोंधळ झाल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून केला जात असून सदर भोंगळ कारभाराची चौकशी करुन संबंधित प्रकरणातील दोषी व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी व लाभार्थ्यांना सिलेंडर गॅसचा पुरवठा करण्यात यावा, यासाठी वन् ामंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे नोव्हेंबर २०१४ मध्ये वाघाच्या हल्यात ठार झालेल्या पद्मा मडावी यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी चिंतलधाबा येथे आले असताना त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. परंतु सहा महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा संबंधीत व्यक्तींवर कुठलीच कारवाई झाली नाही. तसेच लाभार्थ्यांना अजुनपर्यंत गॅसचे वितरणसुद्धा करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना इंधन व्यवस्थेसाठी भटकंती करावी लागत आत्ते. एकीकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वन्य प्राण्यांच्या भितीमुळे नागरिकांना सरपणासाठी जंगलात जाण्यास मज्जाव करतात, तर दुसरीकडे गॅस सिलिंडर वाटप न झाल्याने इंधनाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांची चुल पेटणार कशी, ते जगणार कसे असे विविध प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले असून वनविभागाच्या नाकर्तेपणामुळेच स्थानिकांना सरपण जमा करण्यास जावे लागत आहे. परिणामी ग्रामीण परिसरातील जनतेचे जंगली जनावरांमुळे जीवन धोक्यात येत असून याला केवळ वनविभाग व वनसमिती जबाबदार असल्याचे बोलल्या जात आहे.
सदर प्रकरणाची तात्काळ चौकशीी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी व गॅसपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्याची मागणी चिंतलधाबा व खरमत येथील लाभार्थ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
वनमंत्र्यांचे आश्वासन हवेत विरले
४पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील महिला पद्मा हनुमंत मडावी (३२) ही महिला २१ नोव्हेंबर २०१४ रोजी परिसरातील जंगलामध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेली असता नरभक्षक वाघाने तिच्यावर हल्ला करुन तिला जागीच ठार केले. या महिलेच्या कुटुंबियाना भेटण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नोव्हेंबरमध्ये चिंतलधाबा येथे भेट दिली. पद्मा मडावी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन त्यांचे सांत्वन केले. तेव्हा गावकऱ्यांनी ना.मुनगंटीवारांना भेटून सरपणविषयक समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर त्यांनी वनविभागाचे डेपोवर निस्तार दरातून ३०० रुपये दराने बिट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु अजूनपर्यंत ३०० रुपयांमध्ये मिळणारे निस्तार हक्काचे बिट स्थानिक परिसरात पोहोचलेच नसल्याने त्यांनी दिलेले आश्वासन हवेतत विरले असल्याचे दिसते.