जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक दिन
By Admin | Updated: March 17, 2016 01:15 IST2016-03-17T01:13:35+5:302016-03-17T01:15:08+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिन कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच चंद्रपूरचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राहक दिन
चंद्रपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिन कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच चंद्रपूरचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन, ग्राहक संरक्षण संघटना प्रतिनीधी सुधीर मिसार, ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य ताराबाई पोटदुखे व ग्राहक जागृती संघाचे सचिव प्रभाकर धोपटे यांची उपस्थिती होती.
ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी काय करावे, तक्रार करण्याकरिता वकील करण्याची गरज आहे किंवा नाही याची संपूर्ण माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी यांनी ग्राहकांना दिली.
ताराबाई पोटदुखे यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व काय आहे, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, हक्क कोणते आहे, कर्तव्य काय आहे, हे समजावून सांगितले. ग्राहकांनी वस्तू घेताना त्याची वॅरंटी-गॅरंटी, वस्तु पॅक आहे किंवा नाही, आय.एस.आय मार्क आहे किंवा नाही हे ग्राहकाने बघून नंतरच वस्तु घ्यावी, वस्तु घेतल्या नंतर त्याचे बील घ्यावे. जर वस्तुचे बील नसेल तर ग्राहकाला तक्रार दाखल करता येत नाही. ग्राहकांनी आपल्या हक्का सोबत आपले कर्तव्यपण बजावयाला पाहिजे, असे त्यावेळी त्यांनी सांगितले.
ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी शासनाकडून कोणते प्रयत्न केले जात आहे, याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्किन यांनी ग्राहकांना दिली. ग्राहक दिन कार्यक्रमामध्ये ग्राहकांनी आपल्या व्यथा व तक्रारी व्यक्त केल्या. गावागावात जागृती जनसप्ताह ठेवावा असे ग्राहकांनी सुचविले. संचालन पुरवठा निरीक्षक माने यांनी तर आभार निरीक्षक अधिकारी सतीश साळवे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)