राजुरा तालुक्याला प्रदूषणाचा शाप
By Admin | Updated: December 7, 2014 22:48 IST2014-12-07T22:48:11+5:302014-12-07T22:48:11+5:30
राजुरा तालुक्यात असलेल्या कोळसा खाणींमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर उपाय योजना म्हणून कोणतेही पाऊल उचलण्यात येत नसल्याने

राजुरा तालुक्याला प्रदूषणाचा शाप
गोवारी : राजुरा तालुक्यात असलेल्या कोळसा खाणींमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर उपाय योजना म्हणून कोणतेही पाऊल उचलण्यात येत नसल्याने राजुरा प्रदूषणाचा तालुका म्हणून नावारूपास येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी अग्रेसर मानला जातो. येथे कोळसा खाणींची संख्या अधिक असल्याने धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गोवरी, पोवनी, सास्ती, धोपटाळा, गोवरी डीप या वेकोलिच्या कोळसा खाणी केवळ पाच किमी अंतरावर असल्यामुळे या परिसरात नेहमीच कोळसाने भरलेली जड वाहने रस्त्याने दिवस-रात्रं धावत असतात. जड वाहतुकीने राजुरा तालुक्यातील रस्त्यांचे बारा वाजले असून रस्ते पूर्णत: धुळीने माखले आहेत.
कोळसा वाहतुकीने रस्त्यावरील अपघातात वाढ झाली असून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. कोळसा खाण परिसरात शेतकऱ्यांच्या शेती असल्याने पिकांवर काळ्या धुळीचा थर साचून हाती येणारे पिक पूर्णत: खराब होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून वेकोलिकडून कोणतीही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
वेकोलिच्या कोळसा खाणीमुळे तालुक्याच्या प्रदूषणात वाढ झाली. मात्र यावर वेकोलिकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. उद्योगांमुळे परिसराची भरभराट होते असे म्हणतात. मात्र येथे कोणाचा वचक नसल्याने व प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही याकडे डोळेझाक होत असल्यामुळे राजुरा तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेकोलिच्या नियोजन शुन्य धोरणाचा फटका परिसरातील जनतेला सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)