सर्वाधिक पसंतीमुळे कप-बशी व गॅस सिलिंडर ही चिन्हे सर्वच प्रभागांमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:02+5:302021-01-09T04:23:02+5:30
निवडणुकीत बोधचिन्ह महत्त्वाची ठरतात. प्रचारात त्यांचा कल्पकतेने वापर करता येतो. त्यामुळे चिन्ह आपल्या पसंतीचे मिळावे, या प्रयत्नात उमेदवार असतात. ...

सर्वाधिक पसंतीमुळे कप-बशी व गॅस सिलिंडर ही चिन्हे सर्वच प्रभागांमध्ये!
निवडणुकीत बोधचिन्ह महत्त्वाची ठरतात. प्रचारात त्यांचा कल्पकतेने वापर करता येतो. त्यामुळे चिन्ह आपल्या पसंतीचे मिळावे, या प्रयत्नात उमेदवार असतात. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या बोधचिन्हामधून उमेदवारांना आपल्या नामांकन पत्रामध्ये आपल्या आवडीची तीन चिन्हे पसंतीच्या क्रमाने घ्यायची असतात. बल्लारपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. त्यामधील बऱ्याच उमेदवारांनी १५० चिन्हांमधून आवडीच्या चिन्हांमध्ये कप-बशी आणि गॅस सिलिंडर यांना नामांकन पत्रात पहिली पसंती दिली. हे चिन्ह सर्वांनाच मिळणे शक्य नाही.
चिन्ह वाटप नियमाप्रमाणे प्रत्येक विभागात एक याप्रमाणे या व इतर चिन्हांचे वाटप झाले. त्यात सर्वाधिक संख्या कप-बशी आणि गॅस सिलिंडर यांची आहे. त्याखालोखाल अंगठी, दूरदर्शन संच, शिवण यंत्र, छत्री, बस, कपाट, ऑटोरिक्षा, छताचा पंखा, चावी, बॅट इत्यादी चिन्हांचा समावेश आहे.
या तालुक्यात नऊ जणांची अविरोध निवडणूक झाली आहे. उर्वरित ८३ जागांकरिता १५ जानेवारीला मतदान होणार आहे. प्रचाराने वेग घेतला असून, वेगवेगळ्या माध्यमांद्वारे प्रचार सुरू आहे.
बॉक्स
शेतकी चिन्हांकडे पाठ
निवडणूक आयोगाने सुचविलेल्या निवडणूक चिन्हामध्ये शेतकी उपयोगातील अवजारे, पीक, फळं हीसुद्धा आहेत. ग्रामीण भागातील या निवडणुकीत शेतीविषयक वस्तूंना उमेदवारांकडून पसंती अपेक्षित होती. मात्र, तसे दिसून आले नाही. हिरवी मिरची या चिन्हाला दोघांनी, नांगराला एकाने, सफरचंद तसेच ऊस, नारळ प्रत्येकी एकाने पसंती दिली आहे. या निवडणुकीत उमेदवारांनी शेतकीविषयक वस्तू आणि पीक या चिन्हाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.