कर्मचारंीच मिळवितात सीटीपीएसचे कंत्राट
By Admin | Updated: July 7, 2015 01:00 IST2015-07-07T01:00:52+5:302015-07-07T01:00:52+5:30
कंपनीत सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपनीतील कंत्राट घेता येत नाहीत अथवा त्यासाठी फर्मही तयार करता येत नाही.

कर्मचारंीच मिळवितात सीटीपीएसचे कंत्राट
हितसंबंधासाठी नियम धाब्यावर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रकार
चंद्रपूर : कंपनीत सेवारत असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपनीतील कंत्राट घेता येत नाहीत अथवा त्यासाठी फर्मही तयार करता येत नाही. असे असले तरी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या नावे फर्म बनवून करोडो रूपयांची कामे मिळविल्याचा नवा प्रकार पुढे आला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी सेवा विनियमच्या पान क्रमांक १०० वरील अनुसूची ‘ख’ मध्ये कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या गैरवर्तणुकीच्या कृत्याची यादी दिली आहे. या अनुसूचितील २५, २६ आणि ३३ व्या क्रमांकाच्या मुद्यानुसार, महाजनकोमधील कोणत्याही कर्मचाऱ्याला अथवा त्यांच्या कुटुंबियांना महाजनकोच्या बाहेर व्यापार अथवा व्यवसाय करायचा असल्यास त्याची माहिती कंपनीच्या सेवा तरतुदीनुसार व्यवस्थापनाला द्यावी लागते.
असे असतानाही चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील काही कर्मचारी पत्नीच्या अथवा मुलांच्या नावे फर्म तयार करून त्या माध्यामतून करोडो रूपयांचे कंत्राट घेत आहेत.
नव्या कंत्राटदारांना प्रवेश कठीण
सीटीपीएसमध्ये निर्माण झालेल्या कर्मचारी-कम-कत्रांटदार या साखळीने बाहेरील नव्या कंत्राटदारांना जवळपास नो एंट्री केली आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संधान साधून कंत्राट मॅनेज करायचे आणि काम साधायचे असा हा प्रकार आहे. कंत्राटारांच्या या साखळीमुळे सीटीपीएसमध्ये नेमके काय चालते, याचा पत्ताच बाहेरच्या मंडळींना लागत नाही. तो लागू नये याची खबरदारीही ही मंडळी घेत असल्याने अनेक घोटाळे आतल्या आतच दडपले जातात, अशीही माहिती आहे.