वढा-जुगादच्या संगमावर उसळणार गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:06 IST2018-02-12T23:06:13+5:302018-02-12T23:06:31+5:30
अकराशे वर्षापूर्वीचे दुर्लक्षित जुगाद येथील प्राचीन हेमाडपंती शिवमंदिराचे २००३ मध्ये जीर्णोदाराचे काम पूर्ण करण्यात आले.

वढा-जुगादच्या संगमावर उसळणार गर्दी
आॅनलाईन लोकमत
घुग्घुस : अकराशे वर्षापूर्वीचे दुर्लक्षित जुगाद येथील प्राचीन हेमाडपंती शिवमंदिराचे २००३ मध्ये जीर्णोदाराचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी भरत असलेल्या यात्रेत भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने मंदिर कमिटीकडून चंद्रपूरवरून वढा गावापर्यंत यात्रा बसगाड्यांची सोय केली आहे.
वर्धा नदीवर तात्पुरता सेतु बनविण्यात आला असून महाशिवरात्रीला येथे यात्रा भरणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून मंदिर प्रशासन व्यवस्थेत मग्न असून मंदिरात होमहवन विधीवत सुरू करण्यात आले आहे.
घुग्घुसपासून नजीकच असलेल्या जुगाद हे २०-२५ घराचे गाव आहे. गावालगत उंचावर टेकडी असून त्याठिकाणी नवव्या दशाकापासूनचे मंदिर आहे. मात्र त्या प्राचीन शिलाकृती असलेल्या वर्धा-पैनगंगा वडीचा संगम आणि उत्तम वाहिनीवर उभे होते. त्या मंदिर परिसरात भरदिवसा जाण्याची हिंमत होत नव्हती.
मात्र हे क्षेत्र घुग्घुस पोलीस ठाण्याच्या क्षेत्राच्या बाहेरील असतानाही तत्कालीन ठाणेदार पुंडलिक सपकाळे यांनी मंदिराच्या जीर्नोद्वाराचे काम घुग्घुस व त्या परिसरातील सर्व धर्मीयांच्या मदतीने काम सुरू केले. त्यामुळे या मंदिराचा कायापालट झाला. आज जुगाद शिवमंदिर चमकत असून २००३ पासून सुरू करण्यात आलेल्या येथील यात्रेत पंचक्रोशीतील हजारो भाविक महाशिवरात्रीला दर्शनासाठी येथे येत असतात.