वरोरा (चंद्रपूर) : कोळसा व्यवसायातील १२५.९५ कोटींच्या फसवणूकप्रकरणी येथील बीएस स्टील कंपनी आणि तिच्या अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी सोमवारी (दि. १) गुन्हा दाखल केला. कंपनीचे व्यवस्थापक संचालक भवानी प्रसाद मिश्रा, आशिष पंडित, आदित्य मल्होत्रा व सागर कासनगोटूवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
आर्माको इन्फ्रालिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक शेखर लोहिया यांनी वरोरा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कोळसा पुरवठ्याच्या आमिषाने कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मार्च २०२१ मध्ये लोहिया व आशिष जैन यांनी वरोरा प्लांटमध्ये बीएस स्टील कंपनीचे एमडी भवानी प्रसाद मिश्रा यांची भेट घेतली. त्यावेळी मिश्रा आणि कासनगोटूवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन येथील मार्की मांगली कोळसा खाण भाडेपट्ट्यावर मिळाल्याचे सांगितले. सरकारने ५० टक्के कोळसा खुल्या बाजारात विकण्यास परवानगी दिल्याचे नमूद करून गुंतवणूक करा, तुम्हाला कोळसा पुरवतो अशी ग्वाही दिली. या करारानंतर कंपनीने एक कोटी रुपयांचा धनादेश दिला. त्यानंतर काही प्रमाणात कोळसा पुरवण्यात आला. पुढे मिश्रा यांनी सीएमडीपीएशी करार झाल्याचे सांगत वरोरातील चिनोरा व मजरा येथील खार्णीचा अधिकार मिळाल्याचा दावा केला. ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ६० हजार मेट्रिक टन कोळसा पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, कराराची पूर्तता झाली नाही, असे तक्रारीत नमूद केले आहे.
पाळला नाही करार
आर्माको इन्फ्रालिकने बीएस स्टील कंपनीच्या खात्यात ५४ कोटी जमा केले; परंतु कंपनीने कोळसा दिला नाही. कंपनीने नियमांचे पालन न केल्यामुळे सीएमडीपीएने नोव्हेंबर २०२२ मध्ये करार रद्द केला. लोहिया यांनी दोन्ही खात्यांत बीएस इस्पातला एकूण ७२.५३ कोटी रुपये दिले होते. त्यांपैकी ३५.९३ कोटी रुपयांचा कोळसा मिळाला. जून २०२४ पासून कोळशाचा पुरवठा ठप्प आहे. थकबाकीच्या रकमेची वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळाले नाहीत. १२५.९५ कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४, १२० ब आणि एमपीआयडी कायदा १९९९ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.