शोकांतिकाच! सर्जा-राजाला विकून त्यांनी दिली शेतमजुरांची मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 04:19 PM2022-09-19T16:19:28+5:302022-09-19T16:23:04+5:30

पुरामुळे पिके गेली सडून; शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही

crop loss due to heavy rain, a farmer has pay wages of labourers by selling bullock cart | शोकांतिकाच! सर्जा-राजाला विकून त्यांनी दिली शेतमजुरांची मजुरी

शोकांतिकाच! सर्जा-राजाला विकून त्यांनी दिली शेतमजुरांची मजुरी

Next

बाबूराव बोंडे

तोहोगाव (चंद्रपूर) : पूर आला आणि सर्व काही घेऊन गेला. यात बळीराजा मात्र पुरता संकटात सापडला आहे. एक नाही, दोन नाही तर तब्बल चार वेळी पेरणी केलेली सोयाबीन, कापूस, मिरची पिके भुईसपाट झाली. हे बघून बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील प्रदीप आनंदराव मोरे यांचे मिरचीचे पीक पुरामुळे शेतातच सडून गेले. मात्र लागवड करताना लावलेल्या मजुरांना मजुरी देण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना आपली बैलजोडी विकून त्या पैशाने मजुरी द्यावी लागल्याची दुर्दैवी वेळ आली.

शेतकऱ्यांनी आलेल्या परिस्थितीचा सामना खंबीरपणे व न डगमगता करावा व आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, यासाठी शासन शेतकऱ्यांसोबत आहे, असा गाजावाजा शासन वेळोवेळी करीत आला आहे. असे असले तरी खरी परिस्थिती उलट आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने संकटात कोणीच उभे राहत नाही, हे वारंवार दिसून आले आहे.

अतिवृष्टी, पुराने नासाडी झालेल्या पिकांची व पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा होईल अशी आशा होती. पदरी मात्र सध्या तरी निराशाच आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव परिसरात वर्धा नदी समांतर वाहत असून पुराच्या पाण्याने अनेक गावे बाधित झाली आहेत. जुलैपासून वर्धा नदीला चार वेळा पूर आले. आधी सोयाबीन,कापूस, तूर, धान पिके गेली आणि आता मिरची व मूग पिके पुरात बुडाली.

शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी पीक कर्ज घेतले, कर्जबाजारी होत बियाणे, खते व औषधी घेऊन शेतीची पेरणी केली. पिके हिरवीगार झाली अन् बळीराजा सुखावला. सोयाबीन पीक हातात येणार अशातच, पुन्हा एकदा पुराचे सावट आले नाही. होत्याचे नव्हते झाले. या संकटात शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. आपली शेती उभी करण्यासाठी बळीराजाला आपली बैलजोडी विकावी लागली आणि मजुरी द्यावी लागल्याचे दुःख समस्त शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आणणारे आहे.

Web Title: crop loss due to heavy rain, a farmer has pay wages of labourers by selling bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.