पिकाच्या सिंचनासाठी नहर ठरले कुचकामी
By Admin | Updated: November 2, 2014 22:33 IST2014-11-02T22:33:20+5:302014-11-02T22:33:20+5:30
शेतपिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहर बांधण्यात आले.

पिकाच्या सिंचनासाठी नहर ठरले कुचकामी
चंद्रपूर : शेतपिकांना सिंचनासाठी पाणी मिळावे, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी उपसा सिंचन योजनेअंतर्गत नहर बांधण्यात आले. मात्र सदर नहराचे पाणी पाहिजे त्या प्रमाणात शेतपिकांना मिळत नसल्याने या भागातील धानपीक करपून गेले आहे. नहराचे पाणी रयतवारी गावापर्यंत आल्यानंतर पुढील गावांपर्यंत ते पाणी पोहचतच नाही. शेतपिकांना मिळतच नाही. परिणामी, या परिसरातील धानपीक सुकत चालले आहे.
सुरुवातीच्या काळात या नहराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळत होते. मात्र आता नहराचे पाणी सोडण्याकडे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
सिंचनासाठी पाणी न मिळाल्याने जाम (बु.) येथील खुशाल लोडे रमाकांत चरडुके, ज्ञानदेव हुलके, नकटु उंदिरवाडे, बोनुजी थोरात, दिवाकर थोरात, रसिका गायकवाड, महेंद्र चुनारकर, निनाजी चरडुके, नीळकंठ घडसे, राजेंद्र फाले, मधुकर भिवनकर, उमाजी फाले, शंकर पुंजारे, अनंतराव झाडे, संजय पाल, नामदेव चुधरी, मोरेश्वर मुत्तेमवार, धनू लाडे, गंगाधर बाबनवाडे यांच्या शेतातील धान पीक करपले असून यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. या परिसरात कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागते. शासनाने करून दिलेल्या सिंचनाच्या सोईचाही लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याने सध्या या नहराचे पाणी सोडल्या जात असले तरी त्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी पाण्याचा प्रवाह केवळ मात्र या गावापासून काही अंतरावर असलेल्या जाम (बु.) गावासह परिसरालगतच्या शेतपिकांनाही नहराचे पाणी पोहोचत नसल्याने धानपीक करपत आहे. नहराचे पाणी ज्यादा प्रमाणात सोडण्यात यावे, अशी मागणी रायुकॉंचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)