शेतकऱ्यांपुढे पीक कर्ज फेडण्याचे संकट
By Admin | Updated: April 8, 2016 00:57 IST2016-04-08T00:57:14+5:302016-04-08T00:57:14+5:30
गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून गेलेला आहे. शेतकऱ्यांची खरीप पिके नष्ट झाली.

शेतकऱ्यांपुढे पीक कर्ज फेडण्याचे संकट
भं. तळोधी : गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून गेलेला आहे. शेतकऱ्यांची खरीप पिके नष्ट झाली. पिकाला भावी आर्थिक कमजोरीमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी पूर्णत: संपलेला आहे. गेल्या काही वर्षापासून शेतकरी मदतीची आशा करीत आहे. शेतकऱ्यांपुढे मागील पीक कर्ज कसे फेडणार, या चिंतेने ग्रासला आहे. मात्र आर्थिक मदत किंवा पिकविमा रक्कम त्यांच्या पदरात अजूनही पडली नाही. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
सत्ता प्राप्तीपूर्वी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन आघाडी सरकारने दिले. मात्र पूर्तता करण्यास ते विसरले, असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. गोंडपिपरी तालुक्यातील शेती गाठ्याची असल्यामुळे येथील शेतकरी तूर, धान, कापूस, हरभरा, सूर्यफूल इत्यादी पिके घेत असतो. दरवर्षी शेतकरी बँकाकडून पीक कर्ज घेतात. शेतामध्ये काहीच उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकरी पीक विमा उचलतात. पिक विमा उचलताना बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांना विविध आशा दाखवितात. मात्र, पिक विम्याची भरपाई कधी मिळणार, असा सवाल शेतकरी करीत आहे. गेल्या दोन वर्षापासून गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना कधी कोरडा दुष्काळ, कधी अल्पवृष्टी होऊन नापिकीचा सामना कारावा लागत आहे. गेल्या तीन- चार वर्षापासून शेतकऱ्यांनी पीक कर्ज थकीत ठेवलेले आहे. या वर्षीसुद्धा दुष्काळाची परिस्थिती फार गंभीर आहे. यातच आर्थिक मदत, पिक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)