पीक काळवंडले अन् जनावरही !
By Admin | Updated: December 3, 2014 22:46 IST2014-12-03T22:46:50+5:302014-12-03T22:46:50+5:30
कर्नाटका एम्टा कंपनीच्या कोळसा धुळीच्या प्रदूषणरुपी राक्षसाने कोंढा ते चालबर्डी परिसरातील शेतपिक व जनावरांनाही सोडले नाही. धुळीच्या कणांचा शेतजमिनीवर परिणाम होत असल्याने जमिनीची

पीक काळवंडले अन् जनावरही !
सचिन सरपटवार/ गणेश ठमके - कोंढा (भद्रावती)
कर्नाटका एम्टा कंपनीच्या कोळसा धुळीच्या प्रदूषणरुपी राक्षसाने कोंढा ते चालबर्डी परिसरातील शेतपिक व जनावरांनाही सोडले नाही. धुळीच्या कणांचा शेतजमिनीवर परिणाम होत असल्याने जमिनीची उत्पादन क्षमता घटली आहे. तसेच उभ्या पिकांची नासाडी होत आहे. यासोबतच जनावरांवरही वाईट परिणाम होत आहे.
कोंढाफाटा ते चालबर्डी पर्यंत जवळपास ३४ शेतकऱ्यांची शेती आहे. कोळसा धुळीच्या कणांमुळे ही शेती पूर्णपणे धुळीस मिळाली आहे. ज्या शेतीत किमान हेक्टरी १५ ते २० क्विंटल कापूस उत्पादन होत होते. त्या शेतात जेमतेम पाच क्विंटलही कापूस होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कापसाचे पीक पूर्णपणे काळे झाले आहे. कापसाला भाव मिळत नाही, सोयाबिनचीही परिस्थिती तशीच आहे. जे शेतकरी फक्त शेतीवरच अवलंबून आहे, त्याची परिस्थिती दयनिय झाली असून जगावे तर कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
काळ्याकुट्ट शेताकडे पाहिले तर भिती वाटते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. फक्त राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांना नुकसानभरपाई मिळत असल्याचे कोंढवासीय सांगतात. आजपर्यंत तिघांना ही नुकसान भरपाई मिळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
धुळीच्या कणांचा वाईट परिणाम जनावरांवरही होत आहे. सतत शरीरावर जमा होत असलेल्या कोळशाच्या धुळीमुळे जनावर काळवंडले आहे. पाण्यामध्ये तसेच जनावरांच्या चाऱ्यामध्ये धुळीचे कण पसरल्याने जनावरांमध्ये विविध आजार निर्माण झाले आहे. योग्य त्या चाऱ्याअभावी जनावरांमधील प्रजजन क्षमता कमी होत आहे. जनावरांना योग्य तो औषध व चारा मिळेनासा झाला आहे.
श्वसनाचे, कातडीचे आजार जनावरांमध्ये निर्माण झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात येथील सचिन काळे यांचा बैल जखमी झाला होता. पोपटे यांचा गोऱ्हा मरण पावला तर कृष्णा थेरे व कुशाल नागपूरे यांच्या जनावरांचा अपघात झाला होता. या गंभीर प्रकरणाकडे प्रशासन लक्ष देईल का? असा प्रश्न येथील नागरिकांचा आहे.