विकासाच्या राजकारणात सिंदेवाही तालुक्याची कुचंबना
By Admin | Updated: September 8, 2016 00:46 IST2016-09-08T00:46:47+5:302016-09-08T00:46:47+5:30
चंद्रपूर- नागपूर व चिमूर- गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले सिंदेवाही नगर हे चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यवर्ती केंद्र आहे.

विकासाच्या राजकारणात सिंदेवाही तालुक्याची कुचंबना
विकास खुंटला: पालकमंत्र्यांकडून अपेक्षा
बाबुराव परसावार सिंदेवाही
चंद्रपूर- नागपूर व चिमूर- गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले सिंदेवाही नगर हे चंद्रपूर जिल्ह्यातील मध्यवर्ती केंद्र आहे. धानाचे आगार म्हणून या तालुक्याची ओळख आहे. तसेच हा तालुका वनवैभवानी समृद्ध आहे. महाराष्ट्र शासनाने १९८२ मध्ये सिंदेवाही तालुक्याची निर्मिती केली. आजघडीला ३४ वर्षाचा काळ लोटला असला तरी तालुकावासीयांचा वनवास मात्र संपलेला नाही.
तालुक्याची लोकसंख्या एक लाख २५ हजार असून या तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती आहेत. तालुका वाढला. लोकसंख्या वाढली. तशा समस्याही वाढल्या. मात्र त्या समस्या सोडविण्याची राजकीय इच्छाशक्ती त्या मानाने वाढली नाही. हे वास्तव तालुक्यातील अनेक गावात दिसून येत आहे. नगर पंचायत निर्मितीकरिता सिंदेवाहीकरांना आंदोलन करावे लागले. त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा लागला. तेव्हा कुठे महाराष्ट्र शासनाने सिंदेवाही नगर पंचायत घोषित केली. सिंदेवाही तालुक्यातील अनेक ग्रामखेडे विकासापासून दूर असून रस्ते, वीज, पाणी निवारा, आरोग्य सेवा, सिंचन व्यवस्थेअभावी तालुक्याच्या नशिबी समस्या कायम आहेत. विकासाच्या दृष्टीकोनातून या तालुक्याला चंद्रपूर जिल्ह्यात सावत्रप्रमाणे वागणूक मिळत असल्याने ‘विकास’ या शब्दाचा नेमका अर्थ काय हेदेखील येथील नारिकांना आजवर कळलेला नाही.
मागील दहा वर्षाचा राजकीय आढावा घेतल्यास सन २००४ ते २०१४ पर्यंत ब्रह्मपुरी निर्वाचन क्षेत्रात १० वर्ष भाजपाचे आमदार प्रा. अतुल देशकर होते. तर महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर २०१४ मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार विजयी झाले. तर महाराष्ट्रात भाजपा- शिवसेना युतीची सत्ता आहे. राज्यात भाजपा- शिवसेना सत्ता स्थापन होताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र राज्याचे वन व अर्थ मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले. हे महाराष्ट्र व चंद्रपूर जिल्ह्याकरिता भूषणावह आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरु आहेत तर सिंदेवाही नगर पंचायतीला विकास कामे करण्याकरिता निधी उपलब्ध झाला नाही, हे सिंदेवाही नगराचे दुदैव आहे. सिंदेवाही नगर राष्ट्रीय महामार्गावर असूनही चौपदरीकरण रस्ता मंजूर झाला नाही. सिंदेवाही नगर पंचायतीला निधी न मिळाल्यामुळे येथील स्मशानभूमी व समाज मंदिराची दुर्दशा, गावातील अंतर्गत खड्डेमय रस्त्याची दुर्दशा, सन १९७४ ची जीर्ण नळ योजना, औद्योगिक वसाहत व क्रीडा संकुल धूळ खात पडले आहे. सिंदेवाही तालुक्यात वन उद्यानाला मंजुरी नाही तर निसर्गरम्य व वन्यप्राण्याचा वावर असलेल्या सिंधबोडी स्थळाला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला नाही. हुमन व गोसीखुर्द सिंचन प्रकल्प रेंगाळलेले आहेत.
तालुक्यात उद्योग नसल्याने बेरोजगाराची समस्या वाढून जटील झाली आहे. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. येथील कृषी संशोधन केंद्रात कृषी तज्ज्ञांची नियुक्ती नाही, त्यामुळे संशोधन थांबले आहे. एस. टी. आगार नाही, अशा विविध समस्यामुळे ग्रामसखेड्याचा व सिंदेवाही नगराचा विकास खुंटला असून तालुक्याची विकास गती मंदावली आहे.
झाडीपट्टीतील नवरगावाची उपेक्षा
सिंदेवाही तालुक्यातील झाडीपट्टीतील रंगभूमी म्हणून ओळखले जाणारे तसेच भारतीय शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा नटवर्य स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर यांचे नवरगाव ही कर्मभूमी आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून नवरगावची विदर्भात ओळख आहे. सन १९३५ मध्ये स्वातंत्र्यावीर सावरकर हे नटवर्य बालाजी पाटील बोरकर यांना भेटण्याकरिता नवरगावला आले होते. नवरगाव विदर्भाची सांस्कृतिक पंढरी आहे. सन १९७५ मध्ये बालाजी पाटील बोरकर यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नवरगावला आले होते. याचे स्मरण विदर्भातील जनतेला आहे. नाट्यकलावंत दिग्दर्शक, निर्माता व चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद बोरकर यांनी झाडीपट्टीतील रंगभूमीची परंपरा कायम ठेवली आहे. नुकतेच नवरगावला ‘ताटवा’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. सद्यस्थितीत हे गाव विकासापासून वंचित आहे. नवरगाव हे २० हजार लोकसंख्येचे गाव आहे. नवरगावला तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी व बसस्थानक व्हावे, अशी नवरगाववासीयांची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे. अशा विविध समस्या तालुक्यात निर्माण झाल्या असून जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे, एवढीच सिंदेवाही तालुक्यातील नागरिकांची अपेक्षा आहे.