शेतकऱ्यांवर कापूस वेचणीचे संकट
By Admin | Updated: October 29, 2015 01:34 IST2015-10-29T01:34:05+5:302015-10-29T01:34:05+5:30
कोरपना तालुक्यात कापूस वेचणीकरीता कमी पैशात मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.

शेतकऱ्यांवर कापूस वेचणीचे संकट
शेतकऱ्यांच्या माथी उपेक्षाच
कापूस वेचणीचे भाव कडाडले, मजुरांचा तुटवडा
आशिष देरकर गडचांदूर
कोरपना तालुक्यात कापूस वेचणीकरीता कमी पैशात मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे कापूस वेचण्याकरीता मजुरांअभावी शेतातील कापूस टवटवीत दिसत असतानाही शेतकऱ्यांचा चेहरा मात्र कोमेजलेला आहे.
तालुक्यात मजुरीचे भाव कडाडले असून मजुरांना कापूस वेचणीसाठी चार ते पाच रुपये प्रति किलोप्रमाणे मजुरी द्यावी लागत आहे. त्यामुळे गडचांदूर, कोरपना, नांदा, बिबी, आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, पालगाव, पिंपळगाव, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, थुट्रा, कवठाळा, आसन, अंतरगाव, बोरी, नवेगाव, बाखर्डी, निमनी, भारोसा, भोयगाव या गावांसह आणखी काही गावातील कापूस वेचणाऱ्या मजुरांची सध्या तरी चांदी असून गरीब शाळकरी विद्यार्थी सुद्धा कापूस वेचणीच्या कामी लागले आहे. पण वर्षभर कर्ज काढून शेतीवर अवाढव्य खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांवर हवालदिल होण्याची पाळी आहे. कारण पाढरं सोनं शेतात वेचणीकरीता होऊन असतानाही मजुरांचा तुटवडा व कापूस वेचणीच्या भावामुळे शेतातच गळून पडत आहे.
रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून हरभरा, गहू यासारख्या पिकाच्या मशागतीची कामे सुरु झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक समस्या भेडसावू लागल्या आहे. यंदा शासनाने कापसाला ४ हजार ५० रुपये हमी भाव दिला आहे. खेड्यापाड्यात दलालांकडून ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपयापर्यंत भाव दिला जात आहे. दलाल कमी पैशात खरेदी करु लागले आहेत. यावर्षी पाच ते सहा रुपये प्रति किलो कापूस वेचणी असा भाव असून शेतकऱ्यांना शेती न परवडणारी आहे. शेतकऱ्यांकडे गोदामाची व्यवस्था नसल्यामुळे शेतकरी कापसाची साठवणूक करु शकत नाही. तसेच मजुरांनाही नगदी मजुरी द्यावी लागते. जो मालक नगदी मजुरी देतो अशाच शेती मालकाच्या शेतात मजूर जाताना दिसत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना कापूस विकण्या अगोदरच १२ ते १५ हजार मजुरी द्यावी लागत आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेर गावाहून मजूर आणण्याकरीता आणि परत सोडण्याकरीता आॅटो, मिनीडोअर करावा लागतो. एकतर मजुरीतही वाढ वरुन वाहनांचाही खर्च, एवढेच नाही तर शेतकऱ्यांना मजूर म्हणतील त्याप्रमाणे वागावे लागत असल्याचे बोलके चित्र दिसत आहे. १०० टक्के कापूस वेचायला झाल्याने मजुरांची सध्या कमतरता भासत आहे. त्यामुळे याच संधीचा फायदा घेत मजूर तीन रुपये प्रतिकिलो कापूस वेचणी व ये- जा करण्याकरीता आॅटो किंवा मिनीडोअर या अटीवर कापूस वेचण्याकरीता जात आहे.
सधन कास्तकारांना मजुरी देण्याकरीता विशेष आर्थिक ताण पडत नसला तरी पाच ते सहा क्विंटल कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना अर्धा कापूस मजुरी देण्याकरीताच जात आहे. यात मजुरांचाही काही दोष नाही. कारण कोणताही मजूर आपल्याला दोन पैसे कुठून जास्त मिळतील या प्रयत्नात असतो. वाढत्या महागाईमुळे मजुरीतही वाढ मागणे सहाजिकच आहे. त्यामुळे आता कापूस वेचणीचे यंत्र तरी विकत मिळावे, हा विचार कास्तकार करू लागले आहेत.
वेळोवेळी शेतकऱ्यांना या ना त्या संकटांना तोंड द्यावे लागत असते. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मजुरांचा दुष्काळ जाणवत आहे. त्यामुळे मजुरांनाही पाहिजे तेवढी मजुरी व वाहनांची सुविधा मिळत आहे, हे विशेष !