फॉर्मसीचालकांचा कडकडीत बंद
By Admin | Updated: May 31, 2017 00:57 IST2017-05-31T00:57:14+5:302017-05-31T00:57:14+5:30
आॅनलाईन फार्मसीला विरोध करण्यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारला होता.

फॉर्मसीचालकांचा कडकडीत बंद
आॅनलाईन विक्रीला विरोध : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: आॅनलाईन फार्मसीला विरोध करण्यासाठी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारला होता. त्याचे औचित्य साधून चंद्रपूर येथे चंद्रपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने कडकडीत बंद पाडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला.
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बंदची हाक दिली होती. या मोर्चाचे नेतृत्त्व असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल एकरे यांनी केले. संपूर्ण देशामध्ये आॅनलाईन फार्मसी व्यवसाय सुरू करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्रात ई-फार्मसी हा बेकायदेशीर व्यवसाय असल्याचा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष एकरे यांनी केला. असोसिएशनच्या सदस्य फार्मसी संचालकांनी जटपुरा गेटमार्गे मोचार काढला. तो जटपुरा गेट येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ गेला. तेथे या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्च काढण्यात आला.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. नार्कोटिक्स ड्रग, झोपेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, कोडीन सिरप आदी अनेक धोकायदायक औषधी आहेत. त्याची विक्री आॅनलाईन करणे हानीकारक आहे. याकडे प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
या आंदोलनात असोसिएशनचे सचिव विनोद बुद्धावार, उपाध्यक्ष सचिन चिंतनवार व विलास कासनगोट्टूवार, निवासी उपाध्यक्ष रवींद्र आसूटकर, कोषाध्यक्ष प्रशांत जाजू, अनुप विग्नेश्वर, रणजित दांडेकर, रतन शिलावार यांच्यासह अनेक जण सहभागी होते.