डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर खडीकरण
By Admin | Updated: March 29, 2015 01:13 IST2015-03-29T01:13:27+5:302015-03-29T01:13:27+5:30
तालुक्यातील चारगाव- भारपायली-मानकापूर -पांढरसराड या पाच किलोमिटर रस्त्यावर यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे.

डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर खडीकरण
सावली : तालुक्यातील चारगाव- भारपायली-मानकापूर -पांढरसराड या पाच किलोमिटर रस्त्यावर यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु याच रस्त्यावर खडीकरण करण्याचा अफलातून प्रकार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व कंत्राटदारांकडून होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या यंत्रणेकडून सदर कामाची मंजुरी देण्यात आली आहे. या यंत्रणेमार्फत चारगाव-भारपायली-पांढरसराड मानकापूर या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. सदर मार्गावरचे डांबर अनेक ठिकाणी उखडल्यामुळे पुन्हा डांबरीकरण करणे आवश्यक होते. मात्र संबंधित यंत्रणेने डांबरीकरणाऐवजी खडीकरण करून शासकीय निधीचा गैरवापर केल्या जात असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. चार ते पाच किलोमिटरच्या खडीकरणासाठी सुमारे ३५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. २.२ किलोमिटरचे दोन भाग पाडून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक कामासाठी १७ लाख रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करवून घेतला आहे.
खडीकरणाच्या कामाची गरज नसतानाही केवळ कंत्राटदार आणि स्वत:च्या फायद्यासाठी ही कामे मंजूर केल्याचे बोलले जात आहे. सन २०१३-१४ या वित्तीय वर्षात मंजूर झालेल्या सदर कामावरील आगाऊ रकमेची उचल संबधित कंत्राटदाराने केली असल्याची धक्कादायक माहिती आहे. कोणतेही साहित्य न टाकताच रकमेची उचल करून प्रत्यक्षात मात्र सदर काम या वित्तीय वर्षात करण्यात येत आहे. डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर खडीकरण करण्याचे कारण काय? राज्यातील सर्व गावे डांबरी रस्त्याने जोडली जावीत, असा शासनाचा निर्णय असतानासुद्धा डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर खडीकरण करून अधिकाऱ्यांना काय साध्य करायचे आहे, आलेला निधी खर्च होत नाही म्हणून फक्त खर्च करण्यासाठीच सदर खडीकरण करण्यात येत आहे काय, असा सवाल गावकरी करीत आहेत. या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे अभ्यासू आणि प्रश्नांची जाण असणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. असे असतानाही अशा प्रकारची कामे होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच मागील वर्षी झालेल्या पालेबारसा जनकापूर या दोन किलोमिटर रस्त्याची अशीच परिस्थिती आहे. संबंधीत काम मूल जिल्हा परिषद बांधकाम उपविभागात्.ा यंत्रणेमार्फतीने करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)