फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेची तपासणी
By Admin | Updated: October 14, 2014 23:16 IST2014-10-14T23:16:58+5:302014-10-14T23:16:58+5:30
येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे दिवाळीकरिता बाजारात उपलब्ध असणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेची तपासणी गुरुवारी तुकूम पोलीस मैदान येथे करण्यात आली.

फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेची तपासणी
चंद्रपूर : येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे दिवाळीकरिता बाजारात उपलब्ध असणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाच्या तीव्रतेची तपासणी गुरुवारी तुकूम पोलीस मैदान येथे करण्यात आली.
दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण तसेच वायू प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. याबाबत केंद्र शासनातर्फे प्रत्येक प्रकारच्या फटाक्यांसाठी आवाजाच्या तीव्रतेची विहीत मर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे फटाके फोडल्यानंतर होणारा आवाज हा विहित मर्यादेत आहे अथवा नाही, याबाबत प्रत्यक्ष फटाके फोडून आवाजाच्या तीव्रतेची तपासणी यावेळी करण्यात आली.
तपासणीदरम्यान एकेरी फटाक्यांचा आवाज हा विहीत मर्यादेत असल्याचे आढळून आले. परंतु पाच हजार फटाक्यांच्या माळेचा आवाज हा विहीत मर्यादेत नसल्याचे आढळून आले. तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अ. ना. हर्षवर्धन, उपप्रादेशिक अधिकारी सं. दे. पाटील, क्षेत्र अधिकारी की. प्र. पुसदकर, डॉ. प्रभाकर वावडे, राखीव पोलीस निरीक्षक चौधरी तसेच इको-प्रो संस्थेचे बंडू धोतरे व ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्रा. सुरेश चोपणे उपस्थित होते.
दिवाळी सणाला फटाक्यांचा वापर कमीत कमी करण्याचे तसेच मोठ्या आवाजाचे फटाके व फटाक्यांच्या माळा न वापरणे, फटाके फोडताना काळजी घ्यावी, असे आवाहन याप्रसंगी प्रादेशिक अधिकारी डॉ. हर्षवर्धन यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)