१६ हजार ५२४ कोरोना योद्धांना कोविशिल्ड लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:34+5:302021-01-17T04:24:34+5:30
लस पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा : डॉ. भास्कर सोनारकर, सुरेखा सुतराळेंनी घेतली सर्वप्रथम लस चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयासह ...

१६ हजार ५२४ कोरोना योद्धांना कोविशिल्ड लसीकरणाला सुरुवात
लस पूर्णत: सुरक्षित असल्याचा दावा : डॉ. भास्कर सोनारकर, सुरेखा सुतराळेंनी घेतली सर्वप्रथम लस
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यात शनिवारपासून कोविशिल्ड लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील १६ हजार ५२४ कोरोना योद्धांनी लसीसाठी नोंदणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर व पारिचारिका सुरेखा सुतराळे यांना जिल्ह्यातून सर्वप्रथम कोविशिल्ड लसीचा पहिला डोज देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, आयएमएचे डॉ. अनिल माडुरवार, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत उपस्थित होते.
जि. प. अध्यक्ष गुरनुले म्हणाल्या, कोविड कालावधीत सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या पाठीशी होते. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शासकीय कर्मचारी यांनी उत्तम कार्य केले. आमदार जोरगेवार यांनी जिल्ह्यात १०० टक्के कोरोना लसीकरण यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त केली. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे इतर लाभार्थ्यांनीदेखील यापासून प्रेरणा घ्यावी, असे मत डॉ. सोनारकर व्यक्त केले. आरोग्य अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके यांनी संचालन केले.
यावेळी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, कार्यक्रम व्यवस्थापक श्रीनिवास मुळावार, शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील प्राध्यापक, डॉक्टर, आरोग्य सेवक, लसीकरण अधिकारी चंदा डहाके, सुरेश लडके, अक्षय शास्त्रकार, धनश्री मेश्राम, डॉ. वेनकांत पंगा उपस्थित होते.
प्रत्येक केंद्रावर १०० लसींचे नियोजन
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर व पठाणपुरा आरोग्य केंद्र, वरोरा, ब्रम्हपुरी व राजुरा या सहा केंद्रांवर लसीकरणाची सुरुवात झाली. प्रत्येक केंद्रावर १०० लसींचे नियोजन आहे. लस कुठे द्यावी, कधी द्यावी याबाबत सूक्ष्म नियोजन तयार आहे. कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सर्वांच्या समन्वयाने यशस्वी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी दिली.