कोरोना संसर्ग होण्याचा वेग वाढतच असल्याने कोविड हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर व डेडिकेड कोविड सेंटरमधील खाटांची संख्या फुल्ल झाली. पॉझिटिव्हिटीचा रेट पाहता जिल्हा प्रशासनाला नवीन केंद्रांसाठी इमारती ताब्यात घेण्याची प्रक्रिया क्षणाचाही विलंब न करता पूर्ण करावी लागणार आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत रुग्णांची संख्या २९ हजार ५५४ पोहोचली. आठ हजार ९०४९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. साडेचार लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहरातील काही वॉर्ड, वरोरा व भद्रावती कोरोना हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. बाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. आरटीपीसीआर व अॅन्टिजेन चाचण्यांची संख्या वाढल्याने दरदिवशी एकहजारपेक्षा जास्त व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे चंद्रपुरातील खासगी कोविड रुग्णालयात नवीन रुग्ण दाखल करून घेण्यास बेड्स शिल्लक नाहीत.
केवळ ५८ बेड्स शिल्लक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, राजुरा वरोरा व उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, चंद्रपूर कोविड सेंटर मिळून २० खासगी रुग्णालयांत शुक्रवारपर्यंत ११५६ कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयांच्या बेड्सची क्षमता १२२३ आहे. आता केवळ ५८ बेड्स शिल्लक असून बहुतांश जनरल आहेत.
उपचारासाठी न्यायचे कुठे
राजुरा व वरोरा उपजिल्हा रुग्णालय, क्राईस्ट, वुमन हॉस्पिटल व चंद्रपूर कोविड सेंटर येथे व्हेंटिलेटर्स, खाटा उपलब्ध नाहीत. शिवाजी, मानवटकर, स्पंदन, ख्रिस्तानंद ब्रह्मपुरी, श्वेता हॉस्पिटल, डॉ. बुक्कावर, डॉ. गुलवाडे, डॉ. नगराळे, गुरूकृपा, आस्था, पोटदुखे, संज्योती, दीक्षित, कुबेर, कोलसिटी, डॉ. टिपले हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर्स बेड्स आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढल्याने सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन रुग्ण घेण्यास डॉक्टर तयार नाहीत. आता उपचारासाठी जिवलगाला न्यायचे कुठे, असा प्रश्न रुग्णांच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’कडे विचारला.
पॉझिटिव्हिटीच्या डबलिंग रेटने धडकी
मार्चपासून वेग धरलेल्या पॉझिटिव्हिटीचा रेट खाली न येता पुन्हा वाढतच आहे. शुक्रवारी नोंदविलेल्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येनुसार डबलिंग रेट आता ३९. ३५ वर पोहोचला आहे. हा रेटही खाली येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. बेड्स शिल्लक नसल्याने खासगी डॉक्टर आता नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत असल्याची माहिती रुग्णांच्या कुटुंबीयांनी दिली.
२५ रुग्णालयांतील बेड्स रुग्ण शिल्लक बेड्स
जनरल- ३२४-२७४- ४८
ऑक्सिजन- ६४०- ६३३- ०७
आयसीयू- १७२-१६९- ०३
व्हेंटिलेटर ८७- ८७- ००