देशी कट्टा प्रकरणाचे तार मध्य प्रदेशात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 01:20 IST2016-01-20T01:20:50+5:302016-01-20T01:20:50+5:30
स्थानिक गुन्हे शाखेने १० जानेवारीला चेकदरूर येथील एका युवकाला देशी कट्ट्यासह अटक केली. त्याच्याकडून

देशी कट्टा प्रकरणाचे तार मध्य प्रदेशात
पुरवठादाराचा घेणार शोध : मोठी साखळी असल्याची शंका
चंद्रपूर: स्थानिक गुन्हे शाखेने १० जानेवारीला चेकदरूर येथील एका युवकाला देशी कट्ट्यासह अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मूळचा धुळे येथील रहिवासी असलेल्या एका युवकाला शिर्डी येथून अटक करीत त्याच्याही जवळून देशी कट्टा जप्त केला. या प्रकरणाचे धागेदारे मध्यप्रदेशात असून तेथील देशी कट्टा पुरवठादारास अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.
देशीकट्टा प्रकरणात मोठी साखळी असल्याची शंका पोलिसांना असून त्या दिशेने तपास केला जात आहे. रविवारी १० जानेवारीला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांच्या नेतृत्वातील पथकाने गोपनिय माहितीच्या आधारे गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर येथे सुरू असलेल्या क्रिकेट सामान्यादरम्यान, कमरेत देशीकट्टा ठेवून फिरणाऱ्या एका युवकाच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याजवळून एक देशी कट्टा व चार जीवंत काडतूस जप्त केले. पोलीस कोठडीदरम्यान, त्याच्याकडून पुन्हा १७ काडतूस व चार काडतुसाच्या रिकाम्या केस जप्त केल्या. चौकशीदरम्यान, त्याने हा देशी कट्टा कुणाकडून खरेदी केला याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी देशीकट्टा विक्री करणाऱ्या युवकाला अटक करण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार दूरध्वनीवरून त्याच्याशी संपर्क साधून पुन्हा एक देशी कट्टा पाहिजे, अशी आॅफर दिली. त्याने लगेच शिर्डी येथे येण्याबाबत सांगितल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक पहिल्या आरोपीला घेऊन शिर्डीत दाखल झाले. तेथे सापळा रचला अन् देशी कट्टा विकणाऱ्या त्या युवकाला तेथे अटक केली. त्याच्याजवळून एक देशी कट्टा पोलिसांनी जप्त केला. चौकशीदरम्यान, आपण हा देशी कट्टा मध्य प्रदेशातून खरेदी केल्याची माहिती शिर्डी येथे अटक केलेल्या आरोपीने पोलिसांना दिली. मात्र तत्पूर्वी मध्य प्रदेशातील शस्त्र विक्रेता सतर्क झाला. त्याने मोबाईल बंद करून ठेवल्याने पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. मात्र शस्त्र विक्री करणाऱ्या साखळीचा आम्ही छडा लावू असा विश्वास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांनी ‘लोकमत’ सांगितले. मध्य प्रदेशातच देशीकट्टे तयार होत असून त्याची इतरत्र विक्री केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आरोपी देशी कट्टा हाती घेऊन नाचत होता
४बिहार, उत्तर प्रदेशात शोभावा असा प्रकार १० जानेवारीला गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर येथे घडला. तेथे एका मंडळाने क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आरोपीची चमूदेखील सहभागी झाली होती. ही चमू शेवटच्या टप्प्यात जिंकण्याच्या स्थितीत असताना आरोपीने जिन्स पँटमध्ये खोचून ठेवलेला देशी कट्टा हाती घेऊन आनंदाच्या भरात नाचणे सुरू केले. आणि येथेच तो फसला. स्थानिक गुन्हेशाखेला याबाबत माहिती मिळताच, पोलीस पथकाने जाऊन त्याला अटक केली.