कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

By Admin | Updated: November 22, 2015 00:54 IST2015-11-22T00:54:20+5:302015-11-22T00:54:20+5:30

यंदा निसर्गाने साथ न दिल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Cotton producing farmers suffer from financial crisis | कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

निसर्गाची अवकृपा : वेचणीच्या दरात वाढ, भाव मात्र जैसे थे
राजुरा : यंदा निसर्गाने साथ न दिल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने हमी भावात प्रसाद रूपात फक्त ५० रुपये वाढ केली. वेचणीसाठी मजुराची कमतरता असल्यामुळे नाईलाजास्तव ८ रुपये दराने वेचणी करावी लागत आहे. निसर्गाची अवकृपा झाली, पावसाने साथ दिली नाही. अती उष्णतेमुळे कापूस झाडाची वाढ झाली नाही. झाडांना बोंडाची लागण नाही. उच्च प्रतीचे बियाणे व फवारणी औषधीचा वापर करून सुद्धा उत्पादनाची जैसे थे स्थिती असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यावर्षी सरासरी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस झाला. पावसाने दडी मारली व सूर्याने आग ओकणे सुरू केले. त्यामुळे जमिनीतील ओलावा संपुष्टात आला. निसर्गाच्या पावसावर अवलंबून असलेले शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. मजुरांची कमतरता असल्यामुळे वेचणी झाली नाही. पहिल्या वेचणीचा कापूस झाडावर लोंबकाडत आहे. सधन व धनदांडग्या शेतकऱ्यांनी परगावातील मजुरांना ८ रुपये प्रती किलो वेचणीचा दर व येण्याजाण्यासाठी वाहन उपलब्ध करून घरातून घेणे व घरात पोहोचविणे अशा अटीवर कापसाची वेचणी करून घ्यावी लागत आहे. याचा परिणाम उत्पादन खर्चावर मोठी वाढ झाली आहे. त्या मोबदल्यात हमी भावात फक्त ५० रुपये वाढ दिली आहे. त्यातही अद्याप पावतो शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी खाजगी व्यापारीस पडत्या दरात ३ हजार ८०० रुपयात कापूस विकून गरज भागवावी लागत आहे.
बियाणे व औषधी, खत यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली. मजुरांच्या मजुरीत वाढ झाली त्या तुलनेत कापसाच्या भावात वाढ झाली नाही. शासनकर्त्यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे सांगून उत्पादन खर्चानुसार दरात वाढ करण्याचे म्हटले होते. परंतु, प्रत्यक्षात तसे केले नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे.
पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरीप पीक संकटात आहे. जमिनीत ओलावा नाही. सूर्य आग ओकत आहे. शेतीचा पिकावर जीवन जगणारे शेतकरी हतबल झाला आहे. काय करावे, कसे करावे, कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, बँकेच्या कर्जाची परतफेड कशाने करावी असे महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. एकरी ८-१० क्विंटल होणारा कापूस २-३ क्विंटलवर आला आहे. यंदा कापसाचे उत्पादन ५० टक्के पेक्षा कमी झाले आहे.
कापसाची ४-५ वेळा वेचणी करणारे २ वेळा वेचणीवर आले आहे. ओलीताअभावी व उष्णतेमुळे कापसाची झाडे वाळून चालली आहे. शेतात जावून कापसाकडे पाहण्याची शक्ती संपुष्टात आली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल होवून वर्ष कसे काढावे अशी चिंता त्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. घरचा कर्तापुरूष नापिकीमुळे संकटात सापडल्याने घरची मंडळी धिर देत आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचा शत्रु बनत असल्याने ज्या शेतकऱ्याकडे पैसा आहे, ओलिताचे साधन आहे तोच शेतकरी निसर्गाच्या संकटावर मात करून शेती पिकवू शकतो, असे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची दखल घेऊन कापूस व धानाचे दर वाढविण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Cotton producing farmers suffer from financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.