अस्मानी-सुलतानी संकटात कापूस उत्पादक
By Admin | Updated: January 6, 2017 01:14 IST2017-01-06T01:14:27+5:302017-01-06T01:14:27+5:30
भद्रावती तालुक्यात गुलाबी व शेंदरी बोंड अळीच्या प्रकोपामुळे एक-एका कपाशीच्या झाडावरील २५ ते ३० बोंड किडलेले आहेत.

अस्मानी-सुलतानी संकटात कापूस उत्पादक
भद्रावती तालुक्यातील स्थिती : गुलाबी व शेंदरी बोंड अळीचा प्रकोप
भद्रावती : भद्रावती तालुक्यात गुलाबी व शेंदरी बोंड अळीच्या प्रकोपामुळे एक-एका कपाशीच्या झाडावरील २५ ते ३० बोंड किडलेले आहेत. त्यामुळे कापसाचे बोंड उमललल्यानंतर त्यातून कापूस निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
भद्रावती शिवारातील गवराळा येथील कापूस उत्पादक प्रा. विलास कोटगिरवार यांच्या कपाशी प्लॉटची पाहणी केली असता तेथे बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. पूर्वहंगामी व हंगामी कपाशी पिकावर गुलाबी व शेंदरी बोंड अळीचा प्रकोप असून प्रत्येक झाडावरील २५-३० बोंड अळीमुळे किडलेले दिसून आले आहे. हीच परिस्थिती सभोवतालच्या शेतामध्येही दिसून आली. त्यामुळे कपाशी उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. शेतकरी बोंडअळी प्रतिबंधक कपाशी बियाणांची लागवड करीत आहेत. त्यामुळे हे शेतकरी आतापर्यंत बोंडअळीच्या प्रकोपापासून दूर होते. परंतु गुलाबी व शेंदरी बोंड अळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान होत आहे.
नोटाबंदीमुळे फळे, भाजीपाला, धान्य व कापसाचे बोंड कोसळले आहे. शेतकरी टमाटे व भाजीपाला रस्त्यावर फेकून देत आहे. कापसाला उत्पादन खर्चावर भाव मिळत नाही. कापसाचे चुकारे रोखीने होत नाही. त्यामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच या बोंडअळीची भर पडल्याचे प्रा. विलास कोटगीरवार यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)