Cotton disappears on the mountain between two extremes | दोन वेच्यातच पहाडावरील कापूस गायब
दोन वेच्यातच पहाडावरील कापूस गायब

ठळक मुद्देशेतकऱ्यांची झोळी रिकामी : आता तुरीवरही अळी आल्याने शेतकरी हैराण

शंकर चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती (चंद्रपूर) : पांढर सोनं असे संबोधले जाणाºया कापसाने यंदा शेतकऱ्यांच्या हाती कवडया दिल्या आहेत. कुठे दोन वेच्यात तर कुठे तीन वेच्यातच कापूस झाडावरून गायब झाला असून आता तुरीवरही अळ्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. मात्र अजूनही दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नसल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
मागील पाच वर्षात कपाशी उत्पादनाचा इतिहास पाहता व यंदा हिरवेगार कापसाचे चित्र पाहून शेतकऱ्यांनी विविध स्वप्न रंगविली होती. मात्र परतीच्या पावसाने स्वपन्नाचा चुराडा केल्याने यावषीर्ही शेतकरी कर्जाच्या छायेतून बाहेर निघेल की नाही, ही शंका आहे. पूर्वीही दुष्काळाचे चटके बसत गेले. परंतु यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांना कमालीचा अडचणीत आणणारा ठरला आहे. शेतीतून आर्थिक घडी मजबूत करणारे कपाशी हेच मुख्य पीक आहे. याच उत्पादनाने दगा दिल्याने आता पहाडावरील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. बि-बियाणासाठी घेतलेले बँक कर्ज व सावकारी कर्ज फेडायचे कसे व मुला-बाळाचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.
मागील वर्षी बोंडअळीने तर यंदा निसर्गाने शेतकºयांना उद्ध्वस्त केले आहे. कपाशी पिक शेतकºयांच्या व्यवहाराचा कणा आहे. मात्र अल्पावधीतच हा कणा मोडला गेला. सुरूवातीला पिकांना गरजेनुसार पाऊस पडत गेल्याने पिके जोमात दिसत होती. यंदा तरी आपल्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी होईल, अशी आशा बाळगलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फेरले. हिरवागार दिसणाऱ्या कापसाचा आठवडाभरातच धिंगाना झाला. फुल चाफ्यांची गळती होत बोंडही सडले गेले आणि झाडावर फुटलेल्या कापसाला झाडावरच कोंब निघाले. काहींनी कशीबशी कापसाची वेचणी केली.
मात्र कापूस पाण्यात भिजल्याने कवडीमोल दरात विकावे लागले. नंतरच्या वेच्याला निघालेला कापूस भाववाढीच्या अपेक्षेने घरातच दाबून ठेवला आहे. परंतु बि-बियाणाच्या लागवडीसाठी घेतलेले बँक कर्ज व सावकारी कर्जासाठी शेतकऱ्यांना तंबी मिळत असल्याने कमी दरातच शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. यात शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Web Title: Cotton disappears on the mountain between two extremes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.