डोंगरगाव प्रकल्पाच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार
By Admin | Updated: March 19, 2016 00:41 IST2016-03-19T00:41:53+5:302016-03-19T00:41:53+5:30
राजुरा तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी तयार झालेल्या डोंगरगाव प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे.

डोंगरगाव प्रकल्पाच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार
शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांचा आरोप : कॅनलचे पाणी आल्यास शेती सरकारला दान देईन
राजुरा : राजुरा तालुक्यातील सिंचन वाढविण्यासाठी तयार झालेल्या डोंगरगाव प्रकल्पाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र या प्रकल्पाच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धानोराचे शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांनी केला आहे. डोंगरगाव कॅनलचे पाणी धानोऱ्याला पोहचल्यास आपली शेती सरकारला दान देईन, असे आव्हान दोरखंडे यांनी प्रशासनाला दिला आहे.
डोंगरगाव प्रकल्पाचे पाणी धानोऱ्याला येऊच शकत नाही. करोडो रूपयाचे काम करूनही शासकीय निधीचा दुरुपयोग सुरू आहे. या प्रकल्पासाठी कॅनलवर जेवढा खर्च होत आहे, तेवढ्या खर्चात धानोऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला दोन हातपंप दिले असते तर मुबलक पाणी मिळाले असते, असे दोरखंडे यांनी म्हटले आहे.
अनेक वर्षापूर्वी प्रकल्पासाठी प्रशासनाने शेती घेतली. परंतु अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. आता चंद्रपूरचे कार्यालय मूलला गेले असून शेकडो शेतकरी मागील अनेक वर्षापासून डोंगरगाव प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
धानोरा येथील तलाव खोदून तलावाची माती कॅनलसाठी वापरण्यात येत असून हजारो ब्रास माती रॉयल्टी शिवाय वापरण्यात येत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
‘रोजगार हमी, अर्धे तुम्ही, अर्धे आम्ही’ या उक्तीप्रमाणे डोंगरगाव प्रकल्पापासून धानोरापर्यंत पाणी यावे यासाठी डोंगरगावपासून धानोरा पर्यंतचे कॅनलचे काम सुरू आहे. धानोरा येथील शेतकऱ्याच्या विहिरी बुजवून टाकल्या असून पंढरीनाथ दोरखंडे यांच्या विहिरीत माती टाकली, शेतातील मृर्ती माती टाकून जमिनीत पुरली. याबाबत विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती पंढरीनाथ दोरखंडे, काशिनाथ झाडे, वसंत माहुलीकर, लहु टेकाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यांनी स्वत:च्या हक्कासाठी शेतकरी हवालदिल होत असताना शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
आत्महत्या करण्याच्या इशारा
या कॅनलसाठी कवडीमोल किमतीमध्ये जमिनी घेतल्या. मात्र आता विहिरी बुजवून काम करणारे सिंचाई विभागाचे अधिकारी दादागिरी करीत असल्याचा आरोप पंढरीनाथ दोरखंडे यांनी केला आहे. कॅनलच्या कामात मोठी अफरातफर झाली असून याची चौकशी व्हावी व ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यांना ३० मार्च पर्यंत रक्कम न दिल्यास या विभागाच्या पुढे आत्महत्या करण्याचा इशारा धानोऱ्याचे शेतकरी पंढरीनाथ दोरखंडे यांनी दिला आहे.