नगरसेवकांचा नगरविकासाला विरोध

By Admin | Updated: April 11, 2016 01:05 IST2016-04-11T01:05:12+5:302016-04-11T01:05:12+5:30

येथील नगरपालिकेने अनेक विकासात्मक कामे हाती घेण्यासाठी ७ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते.

Corporators opposed urban development | नगरसेवकांचा नगरविकासाला विरोध

नगरसेवकांचा नगरविकासाला विरोध

सदस्यात एकमत नाही : विशेष सभेत अनेक मुद्यांवर चर्चा
मूल : येथील नगरपालिकेने अनेक विकासात्मक कामे हाती घेण्यासाठी ७ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. सभेची कार्यवाही सुरू झाल्यानंतर केवळ पथदिवे देखभाल व दुरूस्तीच्या कामाला मंजुरी प्रदान करण्यात आली. उर्वरित अनेक विकासात्मक कामांना येथील नगरसेवकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे मूल शहराची काही दिवसातच दयनिय अवस्था बघायला मिळणार आहे.
राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या गृहक्षेत्रातील मूल नगरपालिकेत अनेक विकासात्मक कामे खेचुन आणली, त्यामुळे मूल शहराचा विकास होताना दिसून येत आहे. मूल नगर पालिकेत भाजपाचीच सत्ता आहे परंतु एकमत नसल्यामुळे अनेकदा सभेची कार्यवाही करताना विरोधाचा सामना करावा लागतो. त्यातच मूल नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱयंना गडचांदूर नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मूल नगर पालिकेला पाहिजे त्या प्रमाणात वेळ देत नसल्यामुळे न.प. च्या विकास कामांचे नियोजन करताना पदाधिकाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
मूल नगरपालिकेने ७ एप्रिल रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. मूल शहरातील साफसफाई व घंटागाडी किंवा टाटा एईसीने गोळा करणे, पथदिवे देखभाल व दुरूस्तीचे काम, बांधकाम विभागातील ई-निविदा मधील दर सभेच्या माहिती व मंजुरीकरीता सभेत ठेवण्यात आले होते परंतु बहुतांश नगरसेवकांनी केवळ पथदिवे देखभाल व दुरूस्तीच्या कामाला मंजुरी दिली. त्यामुळे मूलच्या जनतेनी निवडून आलेल्या नगरसेवकांना केवळ राजकारण करण्यासाठी निवडून दिले काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. १७ सदस्यीय मूल नगर पालिकेत भाजपाचे १३ नगरसेवक आहेत. काँग्रेसचे १, राकाँचे २ तर अपक्ष १ नगरसेवक आहे. मूल नगर पालिकेत भाजपाचीच सत्ता आहे. परंतु नगरसेवकाच्या अंतर्गत कलहामुळे विकासकामांना भाजपाचे नगरसेवक विरोध करीत असताना दिसून येत आहे. नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून नगरोत्थान, दलितोत्तर, नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत मूल शहरातील अंतर्गत रस्ते, नालीचे बांधकाम खड्डीकरणाचे काम करण्याबाबत ईनिविदा बोलाविली होती. सभेत सर्व ईनिविदेचे वाचन करण्यात आले. अनेक कंत्राटदारांनी अंदाजकीय दरापेक्षा कमी दराची निविदा टाकल्या होत्या. हेच कारण समोर करून काही नगरसेवकांनी कंत्राटदार कामाचा दर्जा देण्यास असमर्थ असतात. त्यामुळे अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराची निविदा नामंजूर केले आहे. नगर पालिकेने विकासात्मक कामे हाती घेतल्यानंतर कंत्राटदाराकडून बांधकाम अंदाजपत्रकानुसार करून घेण्याची जबाबदारी नगरसेवक व न.प. कर्मचाऱ्यांनी असते परंतु शहर विकासाच्या कामांना नगरसेवकच विरोध करताना दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)

त्यांना शहरातील विकास कामे नको - रिना थेरकर
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून मूल शहराचा कायापालट होत आहे. मूल शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे. परंतु आमच्या काही नगरसेवकांना विकास कामे केलेले आवडत नाही. त्यामुळे ते विरोध करीत असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष रिना थेरकर यांनी दिली. विकासाच्या मुद्यावर तरी सर्वांचे एकमत असायला हवे. त्यात राजकारण आणून विकासाला आडकाठी आणण्याचा हा प्रयत्न आहे. विकासाला विरोध केल्यास नागरिक त्यांना क्षमा करणार नाहीत.
शहर विकासाला विरोध - प्रशांत समर्थ
शहराच्या विकासाचे मुद्दे उपस्थित करून विशेष सभा घेण्यात आली. त्या सभेला आमचेच नगरसेवक प्रत्येकच विषयाला विरोध केले. भाजपाचे नगरसेवक विरोधकांना साथ दिले. त्यांना शहराच्या विकासाशी काहीही देणेघेण्ो नाही. त्यामुळे त्यांनी शहर विकासाच्या विषयाला विरोध केला असे मत नगरपालिकेचे पाणी पुरवठा सभापती प्रशांत समर्थ यांनी व्यक्त केले.

Web Title: Corporators opposed urban development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.