करवाढीच्या विरोधात महानगरपालिकेचा तीव्र निषेध
By Admin | Updated: November 1, 2015 01:16 IST2015-11-01T01:16:39+5:302015-11-01T01:16:39+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेच्या कर वाढीच्या विरोधात दिनांक २ नोव्हेंबर रोजी स्थानिक गांधी चौकात...

करवाढीच्या विरोधात महानगरपालिकेचा तीव्र निषेध
आंदोलन : कर पत्रकाची होळी करणार
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या कर वाढीच्या विरोधात दिनांक २ नोव्हेंबर रोजी स्थानिक गांधी चौकात दुपारी ३ वाजता शिवसेना चंद्रपूर विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वाढीव कर पत्रकाची होळी व हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
सामान्य जनता महागाईमुळे होरपळून निघाली आहे. या महागाईच्या काळात सामान्य जनतेला जगणेसुद्धा कठीण झाले आहे, त्यातच चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत भरमसाट अशी कर वाढ करण्यात आलेली आहे. वाढविण्यात आलेले कर हे मागील कराच्या चार पट असून सामान्य जनतेला त्याचा भरणा करणे कठीण झाले आहे. शिक्षण कर, वृक्ष कर, पाणी कर, विद्युत कर, पथकर, सफाई शुल्क, रोजगार हमी कर, अग्निशमन कर अशा या न त्या मार्गाने जणू सामान्य नागरिकांची लूट केली जात आहे. पाणी कर तथा सफाई कर नव्याने लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अन्य करामध्ये सुमारे पाच ते सहा टक्के वाढ करण्यात आलेली आहे.
महागाईमुळे सामान्य नागरिकांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास त्यातच मनपामार्फत करात करण्यात आलेली अनियमित वाढ अन्यायकारक असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश भिवगडे, शहर प्रमुख सुरेश पचारे, माजी जिल्हा प्रमुख दीपक दापके, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख भारती दुधाणी, भाविसे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, नगरसेवक संदीप आवारी, नगरसेवक विनय जोरगेकर, नगरसेवक आकाश साखरकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)