मनपाकडून रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:19+5:30
या लॅबमध्ये दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता असून याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचारदेखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे. सध्या या कोविड-१९ चाचणी केल्यानंतर निकाल यायला साधारण १२ तासांचा अवधी लागतो.

मनपाकडून रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही दिवसात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी, कोविड-१९ च्या जास्तीत जास्त चाचण्या केल्या जाव्यात. तसेच या चाचण्यांचा निकाल लवकरात लवकर मिळण्याकरिता चंद्रपूर महानगरपालिकेने स्वत:चे पहिले कोविड-१९ अॅन्टिजन टेस्टींग सेंटर जटपुरा वॉर्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा येथे सुरु करण्यात आले आहे.
या लॅबमध्ये दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता असून याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचारदेखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे. सध्या या कोविड-१९ चाचणी केल्यानंतर निकाल यायला साधारण १२ तासांचा अवधी लागतो. रॅपिड अॅन्टिजन टेस्टींग सेंटरच्या माध्यमातून चाचणी केल्यानंतर केवळ १५ ते ३० मिनिटात चाचणीचे निकाल प्राप्त होत असल्याने योग्यवेळी कोविड संशयित व्यक्तींस गाठून त्याच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.
आयुक्त राजेश मोहिते यांनी मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कीर्ती राजुरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात रॅपिड अॅन्टिजन टेस्टींग सेंटर येथील नोडल अधिकारी म्हणून डॉ. वनिता गर्गेलवार यांच्याकडे जबाबदारी सोपविलेली आहे. त्यांना सहाय्यक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे तसेच विद्या चौधरी, स्नेहल शंभरकर, अनिता बंडेलवार, स्मिता उराडे, बालाजी जाधव, शुभम दिवसे, राकेश सोयाम व प्रलय पडगलेवार अशी मनपा टीम येथे कार्यरत आहे.
येथे करण्यात येणाऱ्या चाचण्या या इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चच्या दिशा निर्देशानुसारच करण्यात येतात.
कोविडसदृश्य लक्षणे, ताप, सर्दी, थकवा, खोकला असलेल्या व्यक्ती, कंटेनमेंट झोन किंवा हॉटस्पॉट क्षेत्रातील रुग्ण यांची विशेषत: तपासणी केली जात आहे.