Coronavirus positive story; चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिकार शक्तीच्या जोरावर दोन आजींनी कोरोनाला हरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 22:44 IST2021-05-26T22:43:02+5:302021-05-26T22:44:05+5:30
Chandrapur news डॉक्टरांकडून लवकर उपचार, आहार, विहार आणि दृढ प्रतिकार शक्तीच्या जोरावर दोन वृद्ध आजींनी कोरोनाला हरविल्याची सुखद घटना गोंडपिपरीत उजेडात आली.

Coronavirus positive story; चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिकार शक्तीच्या जोरावर दोन आजींनी कोरोनाला हरविले
वेदांत मेहरकुळे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : डॉक्टरांकडून लवकर उपचार, आहार, विहार आणि दृढ प्रतिकार शक्तीच्या जोरावर दोन वृद्ध आजींनी कोरोनाला हरविल्याची सुखद घटना गोंडपिपरीत उजेडात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागल्यास कोणत्याही वयोगटातील रुग्ण कोरोनाविरूद्धचा लढा जिंकू शकतो, हा संदेशच जणू या आजींनी दिला आहे.
गोंडपिपरी येथील प्रभाग क्र. दोन मधील रहिवासी इंद्रावती झाडे या ७५ वर्षीय आजीसह, मुलगा व सुनेलाही कोरोना संसर्ग झाला होता. आजीची ऑक्सिजन पातळी खाल्यावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयातील कोविड कक्षात भरती करण्यात आले. ऑक्सिजन सोबतच व्हेंटिलेटरची गरज लागण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र डॉक्टरांनी वेळोवेळी केलेले उपचार व रुग्णाकडून मिळालेला प्रतिसाद हा सार्थक ठरला. १६ दिवसांनी इंद्रावती झाडे कोरोनामुक्त झाल्या. आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. धानापूर येथील ताराबाई मारूती ठाकरे ( ६५) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांना गोंडपिपरी येथील कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले. तपासणीदरम्यान हिमोग्लोबिनची कमतरता आणि ऑक्सिजन पातळी ६० ते ६५ दरम्यान खाली आल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. प्रकृती अतिशय नाजूक असल्याने नातेवाईक चिंतातूर झाले होते.
आत्मविश्वास थक्क करणारा
कोरोनाला हरवू शकते. दुसऱ्या ठिकाणी उपचाराला नेऊ नका. गोंडपिपरीतच बरी होते, अशी विनंती रुग्ण ताराबाई ठाकरे यांनी केली. हा आत्मविश्वास पाहून नातेवाईक आणि डॉक्टरही थक्क झाले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप बांबोळे, कोविड सेंटर प्रमुख डॉ. पारस गिरी यांनी वरिष्ठांशी सल्ला घेऊन वृद्ध महिला रुग्णाला दोन बॉटल रक्त दिले आणि कोरोनावरही उपचार सुरू केला. डॉ. बादल चव्हाण व डॉ. नितीन पेंदाम यांच्या देखरेखीत सलग १७ दिवस उपचार केल्यानंतर कोरोनामुक्त झाल्या. कोरोना हा भयानक आजारही बरा होऊ शकतो, हेच या दोन आजींनी सिद्ध करून दाखविले आहे.
ग्रामीण रुग्णालययात आरोग्याच्या उत्तम सुविधा आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबत नातेवाईकांनी घाबरण्याचे कारण नाही. पारंपरिक गैरसमज व अफवांपासून दूर राहावे. लक्षणे आढळल्यास तात्काळ कोविड तपासणी करावी. लवकर उपचार झाल्यास कोरोनावर मात करता येते.
-डॉ. संदीप बांबोळे, वैद्यकीय अधीक्षक, गोंडपिपरी