कोरोना युद्धातील लढवय्यी; चंद्रपूरकन्या डॉ. शहरीश करतेय एम्समध्ये रूग्णसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 07:38 PM2020-04-16T19:38:04+5:302020-04-16T19:38:25+5:30

भोपाळ येथील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये रेडिओलॉजिस्ट पदावर कार्यरत चंद्रपूरकन्या डॉ. शहरीश खान यांनी स्वत:हून तयारी दर्शविली.

Corona war fighter; Chandrapur girl works in AIIMS | कोरोना युद्धातील लढवय्यी; चंद्रपूरकन्या डॉ. शहरीश करतेय एम्समध्ये रूग्णसेवा

कोरोना युद्धातील लढवय्यी; चंद्रपूरकन्या डॉ. शहरीश करतेय एम्समध्ये रूग्णसेवा

Next
ठळक मुद्देउपचार करण्यासाठी स्वत:हून दर्शविली तयारी

राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना व्हायरसच्या दहशतीने गर्भश्रीमंतापासून तर सर्वसामान्य नागरिक आता केवळ रूग्णालये आणि डॉक्टरांनाच देव मानू लागले आहेत. कोरोनावर अद्याप औषधच नसल्याने वैद्यकीय क्षेत्रासमोर उपचाराचे मोठे आव्हान उभे आहे. मात्र, मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये रेडिओलॉजिस्ट पदावर कार्यरत चंद्रपूरकन्या डॉ. शहरीश खान यांनी स्वत:हून तयारी दर्शविली. त्यांनी तपासलेले दोन रूग्ण पॉझिटीव्ह निघाले. त्यामुळे त्या आता क्वारंटाईनमध्ये असल्या तरी कोरोनाविरूद्ध लढ्याची त्यांची उमेद बुलंद आहे.
चंद्रपुरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. एम. जे. खान यांची कन्या डॉ. शहरीश यांनी एमबीबीएस पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर रेडिलॉजिस्ट विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स या नामांकित संस्थेत रेडिओलॉजिस्ट म्हणून निवड झाली. वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांचा सामना केल्यानंतरच ज्ञान व अनुभवाचा पाया पक्का होतो, या संस्कारामुळे डॉ. शहरीश यांनी कोव्हीड १९ च्या संशयित व बाधित रूग्णांवर उपचार करण्याची स्वत:हून तयारी दर्शविली. एम्सच्या व्यवस्थापनाला अनुमती पत्रही लिहून दिले.
मध्य प्रदेशातही कोरोनाचा कहर सुरू असल्याने तेथील एम्समध्ये विशेष कक्ष तयार करण्यात आला. डॉ. शहरीश यांनी एका रूग्णाची तपासणी करून सीटीस्कॅन केली होता. काही दिवसात सदर रूग्ण ताप व खोकल्याच्या उपचारासाठी आल्यानंतर तपासणीअंती पॉझिटीव्ह निघाला. त्यामुळे एम्सला कळविल्यानंतर पुढील उपचार सुरू झाल्याची माहिती डॉ. एम. जे.खान यांनी दिली.

राष्ट्रीय कर्तव्याचा आनंदच
सर्जरी विभागातील ज्येष्ठ सहकारी डॉ. प्रीती व डॉ. शहरीश या दोघींनी मिळून एका संशयित व्यक्तीची तपासणी केल्यानंतर पॉझिटीव्ह निघाला. मात्र काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे एम्स व्यवस्थापनाने दोघींनाही वेगवेगळ्या ठिकाणी होम क्वारंटाईन केले. त्यांची सुट्टी व्हायला पाच दिवस शिल्लक आहेत. साथीचा रोग ही मोठी आपत्ती असली तरी चंद्रपूरकन्या डॉ. शहरीश राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पुन्हा नव्याने दमाने लढ्यास सज्ज होणार आहे.

पित्यानेही दिल्या जिल्हा प्रशासनाला बेड्स
चंद्रपूर जिल्ह्याला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शहरातील खासगी हॉस्पिटल अधिग्रहित करण्यासाठी डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या. डॉ. एम. जे. खान यांनी सर्वात आधी स्वत:च्या हॉस्पिटलमधील सहा बेड्स प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. हा राष्ट्रीय आजार असल्याने गरज पडल्यास पूर्ण हॉस्पिटल उपलब्ध करू देऊ, अशी ग्वाही डॉ. खान यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Corona war fighter; Chandrapur girl works in AIIMS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.