विनाकारण फिरणाऱ्यांची १३६ जणांची केली कोरोना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:25 IST2021-04-26T04:25:24+5:302021-04-26T04:25:24+5:30

मूल : लॉकडाऊन असताना विनाकारणाने वारंवार बाहेर फिरणाऱ्यांवर पायबंद घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी ...

Corona test of 136 people who roamed without any reason | विनाकारण फिरणाऱ्यांची १३६ जणांची केली कोरोना टेस्ट

विनाकारण फिरणाऱ्यांची १३६ जणांची केली कोरोना टेस्ट

मूल : लॉकडाऊन असताना विनाकारणाने वारंवार बाहेर फिरणाऱ्यांवर पायबंद घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड तपासणी करण्याची योजना आखली. रविवारी सकाळी राबविलेल्या या मोहिमेत विनाकारण फिरणाऱ्या १३६ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यात सहा जण बाधित आढळले.

या मोहिमेमुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे. काही वेळातच मूल शहरात स्मशान शांतता निर्माण झाली.

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने, प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन असल्याने फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मात्र, लोकांचे बाहेर पडणे थांबले नाही. त्यामुळे मूल तालुका प्रशासन, नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची अँटिजन तपासणी करण्याची योजना आखली. या मोहिमेत तहसीलदार डाॅ.रवींद्र होळी, पोलीस निरीक्षक सतिशसिंग राजपूत, गटविकास अधिकारी डाॅ.मयूर कळसे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, नायब तहसीलदार यशवंत पवार आदींनी गांधी चौक व परिसरातील रस्त्यावर नाकेबंदी केली. या अनुषंगाने १३६ नागरिकांना अडवून पत्रकार भवन येथे असलेल्या कोविड तपासणी केंद्रात नेण्यात आले व कोरोना चाचणी करण्यात आली. यात सहा जण कोविडबाधित आढळले. अशा प्रकारे असे बाधित असणारे इतरांना बाधित करीत असल्याने रुग्णाची संख्या वाढत आहे.

Web Title: Corona test of 136 people who roamed without any reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.