कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ची होणार आठवड्यातून दोनदा तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:11+5:302021-03-13T04:52:11+5:30
शुक्रवार (दि. १२) पासून शहरात कोरोना चाचणीची सहा केंद्रे सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत १४ हजार ८०४ ...

कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ची होणार आठवड्यातून दोनदा तपासणी
शुक्रवार (दि. १२) पासून शहरात कोरोना चाचणीची सहा केंद्रे सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत १४ हजार ८०४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये ५३५ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रांतर्गत ९ हजार ६७५ रुग्णांची नोंद झाली असून, २३९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकूण बाधित मृतकांपैकी १९० मृतकांची नोंद चंद्रपुरात झाली. दरदिवशी रुग्णांची संख्या वाढत असतानाही नागरिक यापासून धडा घेत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ची आठवड्यातून दोनदा तपासणी करण्याचे पाऊल महानगरपालिका आरोग्य विभागाने उचलले. शुक्रवारपासून मोहिमेला सुरुवातही करण्यात आली. या मोहिमेमुळे कोरोनाबाधित व्यक्ती डिटेक्ट होऊन रुग्णांची संख्या कमी होईल, असा दावा मनपाने केला आहे.
कोण आहेत कोरोना सुपर स्प्रेडर?
चंद्रपुरातील ऑटोचालक, भाजी विक्रेता, हातठेला चालक, किराणा दुकानदार, कापड व्यावसायिक, मेडिकल स्टोअर्स चालक, तसेच दैनंदिन गरजांच्या वस्तू विकणारे व या दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी, सतत नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वच दुकानदारांची कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून मनपाने नोंद घेतली. या सर्वांनी दर १५ दिवसांतून कोरोना चाचणी करून घ्यावी, असा तगादा लावण्यात येणार आहे.
असे आहेत कोरोना चाचणी केंद्रे
वन अकादमी इमारत क्र. १ मूल मार्ग चंद्रपूर, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्र. १ इंदिरानगर मूल मार्ग, अभ्यंकर प्राथमिक शाळा बालाजी वाॅर्ड, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ५ नेताजी चौक बाबूपेठ, सरदार पटेल प्राथमिक शाळा पंचतेली हनुमान वाॅर्ड रामनगर, जुनी लालपेठ कॉलरी हनुमान मंदिराजवळ बागला चौक, चंद्रपूर.
चाचणीनंतर मिळणार प्रमाणपत्र
शहरातील व्यावसायिकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत कोरोना चाचणी केली जाईल. चाचणी झाल्यानंतर संबंधितांना मनपाकडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.