कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST2021-04-12T04:25:53+5:302021-04-12T04:25:53+5:30
चंद्रपूर शहर व जिल्हाभरात अनाथ, वृद्धांसाठी वृद्धाश्रमे व अनाथालय चालविण्यात येतात. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनाथांसाठी झटणारे दाते आपल्या ...

कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय
चंद्रपूर शहर व जिल्हाभरात अनाथ, वृद्धांसाठी वृद्धाश्रमे व अनाथालय चालविण्यात येतात. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील अनाथांसाठी झटणारे दाते आपल्या उत्पन्नातील काही रक्कम अशा आश्रमांसाठी सढळ हाताने दान करीत असतात. मात्र, मागील वर्षीपासून कोरोनामुळे अशा दात्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे अशा दात्यांनी हात आखडते घेतले आहेत. एकीकडे शासनाचे अनुदान नाही, तर दुसरीकडे दातृ्त्वाचा झरा आटल्याने अशा संस्था चालविताना मोठी अडचण जात आहे. त्यामुळे या संस्थांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
अनुदानही वेळेवर मिळत नाही
जिल्ह्यातील काही वृद्धाश्रमे व अनाथालयांना शासनाकडून अनुदान मिळते; मात्र तेसुद्धा अनुदान वेळेवर मिळत नाही. त्यामुळे मोठी अडचण जाते. आजपर्यंत अनेकजण दान करीत होते. मात्र, आता तेसुद्धा बंद झाले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-----
बॉक्स
दात्यांच्या भेटीगाठीच बंद
कोरोनापूर्वी वृद्धाश्रम, अनाथालयांना अनेकजण भेटी द्यायचे. वृद्धाश्रमातील नागरिकांच्या हालचाली जाणून घ्यायचे. आपल्या परीने जे जमेल ती मदत करायचे. मात्र, यंदा हे चित्र पालटले आहे. वृद्धाश्रमात किंवा अनाथालयात येणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे अडचणी भासत आहेत.
बॉक्स
वृद्धाश्रमातील उपक्रम थांबले
चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या वृद्धाश्रमात अनेकजण आपला वाढदिवस साजरा करायचे. यावेळी अनेकजण दानही द्यायचे. तसेच वृद्धाश्रमातील नागरिकांना भेटवस्तू द्यायचे. मात्र, कोरोनामुळे वृद्धाश्रमातील सर्व उपक्रम बंद आहेत.
बॉक्स
मागील अनेक वर्षांपासून अनाथ, मतिमंद मुलांची निवासी शाळा चालवून या अनाथांना आधार दिला जात आहे. अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. उपोषणही केले. मात्र, कोणताही तोडगा निघाला नाही. कर्ज तसेच उसनवारी करून या मुलांना जगविले जात आहे. आता कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून सामाजिक दात्यांकडून फारसी मदत मिळत नाही.
-पुरुषोत्तम चौधरी, संस्थापक सचिव मतिमंद मुलांची शाळा, नागभीड.