Corona patient's family cries for Remedesivir injection | 'रेमडेसिवीर’ इंजेक्शन मिळविण्यासाठी कोरोना रूग्णांचे कुटुंबीय रडकुंडीला

'रेमडेसिवीर’ इंजेक्शन मिळविण्यासाठी कोरोना रूग्णांचे कुटुंबीय रडकुंडीला

ठळक मुद्देट्रिटमेंट प्रोटोकॉल धाब्यावर : खासगी रूग्णालयांकडून इंजेक्शनचा अनियंत्रित वापर

राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनामुळे फुफ्फुसाला किती संसर्ग झाला हे एचआरसीटी अहवालातील स्कोअरनुसार रूग्णाला ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन द्यायचे की नाही, हे ठरविले जाते. मात्र, शहरातील काही खासगी कोविड रूग्णालयांनी ट्रिटमेंट प्रोटोकॉल धाब्यावर बसूवन सौम्य स्थितीतील रूग्णांही इंजेक्शन अत्यावश्यक असल्याचे सांगणे सुरू केले. त्यामुळे इंजेक्शनासाठी धावाधाव करणाऱ्या कोरोना रूग्णांचे कुटुंब रडकुंडीला आले आहेत.
कोरोना बाधित रूग्णाला न्युमोनियासारखा आजार झाल्यास प्रकृतीत गंभीर समस्या निर्माण होतात. रूग्णाची प्रकृती खालावते. त्यामुळे गंभीर व ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी असलेल्या रूग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन जीवनदान देणारी ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिवीरला मान्यता दिल्यानंतर राज्यात ३० जुन २०२० पासून हे इंजेक्शन देणे सुरू झाले आहे.
एचआरसीटी रिपोर्टकडे कानाडोळा
कोरोनामुळे फुफ्फुसाला किती संसर्ग झाला हे एचआरसीटी अहवालातून माहिती मिळते. संसर्गाचा स्कोअर २५ आहे. २५ पैकी स्कोअर ५ असेल तर संबंधित रूग्ण गंभीर नाही. हा स्कोअर ६ च्या पुढे असेल तर रूग्ण गंभीर ठरतो. अशा रूग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते. मात्र, या अहवालाकडे दुर्लक्ष करून काही खासगी कोविड रूग्णालयांनी ५ स्कोअरच्या आतील रूग्णांनाही इंजेक्शनची शिफारस करत आहेत, अशी माहिती चंद्रपुरातील एका कोविड रूग्णाच्या कुटुंबाने ‘लोकमत’ला  दिली. 
 

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना डॉक्टरांकडून शिफारस कशाला?
शहरात रेमडेसिवीर उपलब्ध नसताना खासगी रूग्णालयांकडून याच इंजेक्शनची शिफारस केली जात आहे. रूग्ण जर अतिशय गंभीर असेल तर इतरत्र अथवा शासकीय कोविड रूग्णालयात हलवा, असे न सांगता इंजेक्शनच आणा, असा तगादा लावला जात आहे. त्यामुळे रूग्णाचे कुटुंबीय घाबरून मेडिकल स्टोअरची भटकंती करीत आहेत, हा प्रकार योग्य नाही. तुटवडा असताना याच इंजेक्शनची डॉक्टरांकडून शिफारस कशाला? असा प्रश्न एका औषध विक्रेत्याने विचारला आहे.

जनऔषधी केंद्रासमोर इंजेक्शनसाठी रांग
चंद्रपुरातील रेडक्रास भवनातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राला आज ९० इंजेक्शन मिळाले. कोविड खासगी रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांना हे इंजेक्शन टोचणे अत्यावश्यक असल्याचे कुटुंबियांना सांगितले जात आहे. त्यामुळे सोमवारी या रेडक्रास भवनातील केंद्रासमोर मोठी रांग लागली होती.
फक्त ६१० इंजेक्शन उपलब्ध
मंगळवारी चंद्रपुरातील रेडक्रास भवन जेनरिक औषधी केंद्रात ९०, पंत हॉस्पिटल २८० व क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये २४० असे एकूण ६१० रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाले. दोनही खासगी हॉस्पिटलने हेट्रो हेल्थ केअर कंपनीकडून हे इंजेक्शन थेट विकत घेतले, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.

कोविड रूग्णाला गरज नसताना रेमडेसिवीर दिल्या जात असेल तर हे चुकीचे आहे. गंभीर व ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी असलेल्या रूग्णांना हे इंजेक्शन परिणामकारक आहे. कोविड रूग्णालय म्हणून परवागनी मिळालेल्या खासगी रूग्णालयांना थेट कंपनीकडून इंजेक्शन विकत घेता येते. तशा सूचनाही दिल्या होत्या. काही रूग्णालये विकत घेत आहेत. असे झाल्यास रूग्णाच्या कुटुंबीयांना इतरत्र भटकावे लागणार नाही.
-निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

उपलब्धतेनुसार नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच रेमडेसिवीर इंजेक्शन वितरण केले जात आहे. इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये व गरजु रूग्णांनाच हे इंजेक्शन मिळावे, याकडे गंभीरतेने लक्ष दिले आहे.
- सी. के. डांगे, निरीक्षक अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर

 

Web Title: Corona patient's family cries for Remedesivir injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.