चंद्रपुरात कोरोना प्रयोगशाळा उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:01:06+5:30
कोरोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी घशातील थुंकीची चाचणी केल्या जाते. विदर्भात सध्या नागपूर येथे ही तपासणी होत आहे. नुकतीच राज्य शासनाने अकोला येथे अतिरिक्त प्रयोगशाळा उघडण्याची घोषणा केली होती. तथापि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विभागाच्या सामाजिक दायित्व निधीतून दोन कोटी १८ लक्ष खर्चाची तरतूद करत या कामाला उद्यापासून सुरुवात करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

चंद्रपुरात कोरोना प्रयोगशाळा उघडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या बाबतची तपासणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्वॅब तपासणीची प्रयोगशाळा चंद्रपूर येथे सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी येथे ही घोषणा केली. मंगळवारपासूनच जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात या कामाला सुरुवात होणार आहे.
कोरोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी घशातील थुंकीची चाचणी केल्या जाते. विदर्भात सध्या नागपूर येथे ही तपासणी होत आहे. नुकतीच राज्य शासनाने अकोला येथे अतिरिक्त प्रयोगशाळा उघडण्याची घोषणा केली होती. तथापि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विभागाच्या सामाजिक दायित्व निधीतून दोन कोटी १८ लक्ष खर्चाची तरतूद करत या कामाला उद्यापासून सुरुवात करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. यासोबतच जिल्ह्यात आवश्यक असणाऱ्या २० व्हेंटीलेटरची खरेदी सामाजिक दायित्व निधीतून करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग संदर्भात सुरू असलेल्या प्रशासनाच्या कामाचा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, आयुक्त राजेश मोहिते यांच्याकडून आढावा घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना व्हिडिओ संदेश देताना त्यांनी ही घोषणा केली. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एस. मोरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
इतर राज्यात अडकलेल्यांना आणणार
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो मजूर अन्य राज्यात कामाला आहे. लॉकडाऊनमुळे ते अडकले असून त्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची आबाळ होत आहे. आपल्या परिवारापासून दूर असणाऱ्या या नागरिकांना घरापर्यंत पोहोचविणे गरजेचे असून या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनंती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लवकरच हा गुंता सोडवण्यात येईल, असे ना. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
तेंदूपत्ता संकलनाबाबत लवकरच निर्णय
राज्याचा महसूल वाढवण्यासाठी आणि गडचिरोली चंद्रपूर व लगतच्या जिल्ह्यातील तेंदूपत्ता उत्पादक व मजूर यांना रोजीरोटी मिळावी, यासाठी तेंदुपत्ता संकलनाला शासनाने परवानगी द्यावी. तसेच आॅनलाइन स्टॅम्प ड्युटी विक्रीला सुरुवात करावी ,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्याच्या सीमा ओलांडू नये
चंद्रपूर जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. पॉझिटिव्ह रुग्ण असणारे नागपूर, यवतमाळ जिल्हे शेजारी आहेत. अन्य राज्यांच्या सीमादेखील चंद्रपूरला लागून आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याच्या सीमा ओलांडून सुरू असलेल्या अपडाऊनला बंद करा. जिल्हा पोलीस अधीक्षकांना संपूर्ण सीमारेषेवर आणखी बंदोबस्त वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे. सीमावर्ती भागातील गावातील नागरिकांनीदेखील आपल्या गावात येणाºया नवीन व आगंतुक लोकांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
केशरी कार्डधारकांनाही धान्य
पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात दोन व तीन रुपये दराने अन्नधान्य व मोफत तांदूळ वाटप सुरु आहे. तरीही अनेक कुटुंबाला तेल, तिखट, डाळ, साखर अशा जीवनावश्यक किराणा वस्तूंची गरज आहे. सामाजिक दायित्व निधीतून जिल्ह्यातील गरिबी रेषेखालील एक लाख ३० हजार व अंत्योदय योजनेतील एक लाख लाभार्थ्यांना २० एप्रिलपासून रेशन दुकानातून धान्य वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात कोणाचीही उपासमार होऊ नये, शिव भोजन योजना, मोफत अन्नदान योजना राबविताना माणुसकीच्या नात्याने समान वितरण व्हावे, यामध्ये कोणताही दुजाभाव होऊ नये, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असेही त्यांनी सांगितले.