चंद्रपूर : कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट, तणाव यामुळे मानसिक रुग्णांच्या आजारामध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे होती, त्यांना तीव्र लक्षणे जाणवत असल्याची भीती व्यक्त होत आहे. चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात सद्यस्थितीत ९ रुग्ण भरती आहेत तर मागील वर्षभरात ओपीडी व आयपीडीमध्ये ३,५९० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
वाढते धकाधकीचे जीवन, कामाचा ताण, कौटुंबिक कलह यामुळे अनेकांमध्ये नैराश्य निर्माण होते. त्यातच कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले, हातातील काम गेले, भविष्यासाठी जमा केलेली पुंजीही गमावण्याची वेळ आली. याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला. परिणामी अनेकजण डिप्रेशन (नैराश्य)च्या विळख्यात सापडले आहेत. मात्र, अनेकजण बदनामीला घाबरुन रुग्णालयात गेलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या आजारात वाढ झाली तर सौम्य लक्षणे असलेले रुग्ण कोरोनामुळे रुग्णालयात वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्येही तीव्र लक्षणे आढळून येत आहेत. सन २०२०मध्ये ओपीडीमध्ये ३,४१८ तर आयपीडीमध्ये १७२ रुग्णांची नोंद करण्यात आली. ही आकडेवारी चिंताजनक आहे.
कोट
जिल्ह्यात मानसिक रोग नियंत्रण टीम कार्यरत आहे. यामध्ये मानसिक रोग तज्ज्ञ, समाजसेवा अधिकारी, स्टॉप नर्स, यांचा समावेश आहे. ही टिम प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयाला आठवड्यातून एक दिवस भेट देते. यावेळी अशामार्फत सौम्य, मध्यम व तीव्र रुग्णांची नोंद करुन सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर तिथेच उपचार केला जातो. तर तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविल्या जाते. कोरोनामुळे काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली असून भरती नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकीत्सक, चंद्रपूर.
कोट
कोरोनामुळे अनेक कुटुंब एकत्रित आले. त्यामुळे कौटुंबिक वादविवाद निर्माण झाला. रोजगार गेल्याने आर्थिक तणाव वाढला. तसेच कोरोनाची भीती व चिंता अशा कारणामुळे काही प्रमाणात मानसिक रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच कोरोनामुळे उपचार घेत असलेले रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांनाही आता समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. विवेक बांबोळे, मानसिक रोग तज्ज्ञ, चंद्रपूर.