कोरोना पाठोपाठ नागरिकांवर सारी व आयएलआयचे दुहेरी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:56 IST2020-12-04T04:56:29+5:302020-12-04T04:56:29+5:30
चंद्रपूर : दिवाळीनंतर कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आता चंद्रपूर जिल्हावासियांवर आयएलआय व सारीचे दुहेरी संकट आल्याचे दिसून येत ...

कोरोना पाठोपाठ नागरिकांवर सारी व आयएलआयचे दुहेरी संकट
चंद्रपूर : दिवाळीनंतर कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आता चंद्रपूर जिल्हावासियांवर आयएलआय व सारीचे दुहेरी संकट आल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन जिल्ह्यात १ एप्रिल ते २ डिसेंबरपर्यंत ६११ सारीचे, ३८ हजार ६३० आयएलआयचे तर साधारण तापाचे २४ हजार ४१९ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आयएलआयने चार, सारीने सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणा हादरुन गेली होती. मात्र प्रशासनाच्या व आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र दिवाळी भाऊबीजपासून रुग्णसंख्या वाढयला लागली. त्यातच आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरु केले. त्यामुळे कोरोना रुग्णांसह सारी व आयएलआयचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. १ एप्रिल ते २ डिसेंबर या कालावधीमध्ये जिल्ह्याभरात ६११ सारीचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी जागृक राहून बाहेर पडताना मास्कचा वापर करावा, तापाची लक्षणे आढळल्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून तपासणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
तालुकास्थळी फिव्हर क्लिनिक
सारी व आयएलआयची वाढती रुग्णसंख्या बघून आरोग्य विभागातर्फे आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून तपासणी सुरु आहे. तसेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा, यासाठी प्रत्येक तालुका स्थळी फिव्हर क्लिनिक सुरु करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.
ताप अंगावर काढणे टाळा
हिवाळ्यात व्हायरल फ्लयूचे रुग्ण वाढत असतात. मात्र त्यामध्ये कोरोना किंवा सारीचे रुग्णही असू शकतात. त्यामुळे कोणताही आजार अंगावर काढू नका, किंवा स्वत: मेडिकलमधून गोळ्या घेणे टाळून आरोग्य विभागाचे सल्याने उपचार घ्या. - राज गहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर