कोरोना लढ्यात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:46+5:302021-03-08T04:26:46+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वच ...

Corona fighting requires the participation of all elements | कोरोना लढ्यात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक

कोरोना लढ्यात सर्व घटकांचा सहभाग आवश्यक

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वच घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी व्यक्त केले.

‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी बल्लारपूर व राजुरा विभागातील लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, पंचायत समिती सभापती इंदिरा पिपरे, बल्लारपूूर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच, नगरसेवक, तसेच बल्लारपूर राजुरा येथील सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोविड १९च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता, आपआपल्या क्षेत्रातील सर्व नागरिकांना स्वत:हून कोविडची तपासणी करून घेणे, कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती देणे, त्यासोबतच मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, लग्न व इतर सामूहिक समारंभाच्या ठिकाणी नियंत्रित संख्या ठेवणे, कोरोनासंदर्भातील लक्षणे आढळताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आदींबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीं, अधिकारी व उद्योगातील आस्थापनांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिक व कर्मचाऱ्यांना उद्युक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी केले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी गुल्हाने व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी मूल येथील कन्नमवार सभागृहातही मूल व पोंभुर्णा येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून, कोरोना नियमांची त्रिसूत्री पाळण्याबाबत आपापल्या कार्यक्षेत्रात जनजागृती करण्याचे आवाहन केले. ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी गुल्हाने सोमवारी भद्रावती व वरोरा तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे, महादेव खेडकर, नगरपालिकेचे विजयकुमार सरनाईक, सिद्धार्थ मेश्राम, तहसीलदार संजय राईंचवार, डॉ.रवींद्र होळी, डॉ.नीलेश खलके, पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, तसेच किरणकुमार धनावडे, जयंत कातकर, रमेश कुळसंगे, सी. जे. तेलंग, अजय मेकलवार नगरपरिषद व तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Corona fighting requires the participation of all elements