Convert the CCC bed to an oxygen bed | सीसीसी बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रूपांतरीत करा

सीसीसी बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रूपांतरीत करा

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : कोरोना टास्क समितीला सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने गंभीर रूग्णांवर उपचारासाठी कोविड केअर सेंटरमधील (सीसीसी) सर्वसाधारण बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रूपांतर करण्याच्या सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोना टास्क समितीला दिल्या. कोरोना उपाययोजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सुधीर मेश्राम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे गरजेचे आहे. नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्रांची संख्याही अधिक वाढविण्यात यावी. कोरोना रूग्णांवर उपचार करताना इतर व्याधीग्रस्त रूग्णांकडेही दुर्लक्ष होऊ देऊ नये, असेही त्यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडविणे व रूग्णालयाची नियमित साफसफाई व्हावी, आदी सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या. उपलब्ध औषध साठा, मनुष्यबळाची उपलब्धता, व्हेन्टीलेटर बेड, आयसीयु व रिक्त बेड संख्या तसेच लसीकरणाचाही आढावा घेण्यात आला. लसीकरणाच्या वेग वाढविण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

नागरिकांना मिळणार सहजपणे माहिती
 जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांची माहिती व सेवांचा लाभ घेण्यासाठी  चंद्रपूर ऑक्सिजन संकेतस्थळाचा शुभारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आली. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र चंद्रपूर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनाखाली अँड्रॉइड स्टुडिओ व ओपन सोर्स फ्लटर फ्रेम वापरून हे अप्लीकेशन विकसित केले. अ‍ॅपमध्ये कोविड १९ बाबत सर्व माहिती, प्रशासनाचे आदेश, रेशन कार्ड सुविधा, ताडोबा पर्यटन ऑनलाईन बुकिंग व जिल्हा कार्यालयांच्या वेबसाईट लिंक अ‍ॅपमध्ये दिल्या आहेत.

 

Web Title: Convert the CCC bed to an oxygen bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.